esakal | दीड लाख जीम कामगारांवर उपासमारीची वेळ; मालक राज्य सरकारच्या आशेवर
sakal

बोलून बातमी शोधा

दीड लाख जीम कामगारांवर उपासमारीची वेळ; मालक राज्य सरकारच्या आशेवर

मुंबईत एकूण दोन हजारहून अधिक लहान मोठ्या जीम आहेत. कोरोना काळापुर्वी त्यात तब्बल दिड लाखांहून अधिक कर्मचारी आणि प्रशिक्षक कार्यरत होते

दीड लाख जीम कामगारांवर उपासमारीची वेळ; मालक राज्य सरकारच्या आशेवर

sakal_logo
By
जीवन तांबे


चेंबूर:  मुंबईत एकूण दोन हजारहून अधिक लहान मोठ्या जीम आहेत. कोरोना काळापुर्वी त्यात तब्बल दिड लाखांहून अधिक कर्मचारी आणि प्रशिक्षक कार्यरत होते. कित्येक तरुणांनी तर प्रशिक्षणाचा कोर्स पुर्ण करत या व्यवसायाला आपले उदरनिर्वाहाचे साधन बनवले होते. मात्र, लाॅकडाऊनमुळे गेल्या सहा महिन्यांपासून हा व्यवसायच ठप्प पडल्याने यावर अवलंबून असणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे जिम मालक आणि कर्मचारी सरकार लवकरच परवानगी देईल, या आशेवर जगत आहेत.

कंगनाला नुकसान भरपाई मिळावी; रामदास आठवलेंची राज्यपालांकडे मागणी

कालांतरांने श्रीमंतांबरोबरच मध्यमवर्गींयांचाही जीमकडे कल वाढू लागला तसतसे मुंबईत तळवटकर, पाठारे, चेंबूरकर हेल्थ क्लब याबरोबर असंख्य जिमचा उदय झाला. आता दर वर्षी व्यवसाय म्हणून नवनवीन जिम उदयाला येत आहेत. कित्येक तरुणांनी व्यायामाचा प्रशिक्षण कोर्स करून या व्यवसायाला आपले उपजीविकेचे साधन बनविले. मात्र, जगभर कोरोनाचे थैमान सुरू झाल्यानंतर इतर क्षेत्रांसोबतच जीम व्यवसायालाही याचा मोठा फटका बसला.  लॉकडाऊनमूळे अचानककाम ठप्प झाल्याने या जीममधील कामगारांना विनापगार सहा महिने घरी बसावे लागले आहे. त्यामुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावरही परिणाम होत आहे. काही मालकांनी या काळातही माणुसकीच्या दृष्टीने आपल्या कामगारांना पगार दिला आहे. मात्र त्याचा आर्थिक फटका त्यांना बसला आहे. तर, बहुसंख्य कामगारांना या काळात पगारच देण्यात आले नाही.

मुंबई शहरात डिसेंबर 2019 ते जानेवारी 2020 दरम्यान काहींनी मोठ्या प्रमाणत गुंतवणूक करून जिम सुरू केल्या. तर, काहींनी लॉकडाऊन सूरु होण्यापूर्वीच या व्यवसायात गुंतवणूक केली होती. त्यांना प्रचंड नुकसान सोसावे लागले आहे.
जीममधील साधने तशीच धूळ खात पडली आहेत.  काही मशनरी खराब झाल्या आहेत. तर, काही खराब होऊ नये म्हणून त्यांची देखभाल करावी लागत आहे. मात्र, कोणतीही आवक नसल्याने तो अतिरिक्त खर्च कसा सहन करायचा, असा सवाल जीम मालकांनी केल आहे. 

सुशांतसिंहला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील; बिहार निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रीया

100 किलो वजन 60 वर    
जिम सुरू नसल्याने पुर्वीच शरीर कमावलेल्यांना घरी व्यायाम करता येत नाही. तसेच प्रशिक्षकांनासुद्धा व्यायाम करता येत नाही. त्यांच्या डाएटवरही मोठा परिणाम झाला आहे. लॉकडॉऊनमध्ये 100 किलोपेक्षा अधिक वजन असलेल्या प्रशिक्षकांचे वजन आता 60 ते 65 किलो झाले आहे. मित्र, नातेवाईक यांच्या कडून घर खर्चाकरिता त्यांना पैसे मागावे लागत आहे.  कित्येकांचे मानसिक व शारीरिक संतुलन बिघडले आहे 
 

आमच्या जिमला 32 वर्ष पूर्ण  झाले आहेत. यापुर्वी कधीही जिम बंद नव्हती. मी कामगाराना माणुसकीच्या दृष्टीने सहा महिने पगार दिला. मात्र, मला जिम बंद असल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे. 
- प्रदीप  चेंबूरकर, संचालक, चेंबूरकर्स हेल्थ क्लब

मी गेल्या कित्येक वर्ष जिममध्ये जात आहे.  मला मधुमेह, रक्तदाबाचा त्रास आहे. सहा महिने जिम बंद असल्याने व्यायाम बंद आहे. त्यामुळे मधुमेह, रक्तदाब वाढत आहे.  व्यायामामुळे कमी झालेल्या गोळ्याही आता वाढल्या आहेत.
- आनंत देवडीड,
जिम सदस्य 

प्रशिक्षक, बॉडी बिल्डर हे तळागाळातील आहेत. त्यांची उपजीविका जिमवर अवलंबून आहे. जिम सुरू करण्यास परवानगी दिली तर आम्ही नक्कीच सरकारचे नियम, अटी पाळणार.  मी माझ्या कर्मचाऱ्यांना तीन महिने नियमित पूर्ण पगार दिला. आता अर्धा पगार द्यावा लावत आहे. कामगारांसोब आता मालकांचीही उपासमार होत आहे. सरकारने तातडीने योग्य निर्णय घेऊन जिम सुरू करण्यास परवानगी द्यावी. 
- चेतन  पाठारे,
महासचिव, भारतीय शरीर सौष्ठ संघटना

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )