वृक्ष कापताना 15 पोपट दगावले 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

महामार्ग रुंदीकरणाआड येणारे दर्ग्याजवळचे 50 वर्षांपेक्षा अधिक जुने जांभळाचे झाड कापण्याचे काम सुरू होते. त्या वेळी त्या झाडाच्या ढोलीत असलेले 15 पोपट मृत्यमुखी पडले. त्यामध्ये वाढ झालेले 4 आणि 11 पिल्लांचा समावेश होता.

खालापूर : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर खोपोली-खालापूर दरम्यानच्या रस्ता रुंदीकरणाच्या आड येणारा वृक्ष कापत असताना पोपटांची 15 पिल्ले मृत्युमुखी पडली. ही हृदयद्रावक घटना गुरुवारी (ता.20) घडली. या प्रकरणी कंत्राटदारावर कारवाईचे संकेत वन विभागाने दिले आहेत. 

महामार्ग रुंदीकरणाआड येणारे दर्ग्याजवळचे 50 वर्षांपेक्षा अधिक जुने जांभळाचे झाड कापण्याचे काम सुरू होते. त्या वेळी त्या झाडाच्या ढोलीत असलेले 15 पोपट मृत्यमुखी पडले. त्यामध्ये वाढ झालेले 4 आणि 11 पिल्लांचा समावेश होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर खोपोलीतील अपघातग्रस्त मदत पथक आणि प्राणिमित्र संघटनेचे गुरुनाथ साठेलकर, हनीफ कर्जीकर, दिनेश ओसवाल आणि अमोल कदम यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी निष्काळजीपणाबाबत कंत्राटदाराला जाब विचारला. त्यानंतर काम थांबविण्यात आले. वन परिमंडळ अधिकारी एस. टी. ढाकवळ यांनीही घटनास्थळी भेट दिली. मृत पोपटांचा पंचनामा करण्यात आला आहे; तर वाचलेल्या पिल्लांची देखभाल आणि संगोपनासाठी शिवदुर्गचे सुनील गायकवाड यांनी पुढाकार घेतला आहे. 

धक्कादायक : अन्‌ स्कायवॉकवरून तिने मारली उडी..

महामार्ग रुंदीकरण करणाऱ्या कंत्राटदाराचा निष्काळजीपणा पक्ष्यांच्या जीवावर बेतला आहे. वृक्षतोड करताना आवश्‍यक काळजी घेतली जात नाही. नवजात पिल्लेदेखील कटरने कापली गेली. हा अमानुष प्रकार आहे. कंत्राटदारावर कारवाई करणे आवश्‍यक आहे. 
- गुरुनाथ साठेलकर, प्राणिमित्र संघटना 

खोपोली पालिकेने वृक्षतोडीस परवानगी दिली असली, तरी त्या ठिकाणी जबाबदार व्यक्ती कोणीही नव्हती. कंत्राटदाराने खबरदारी घेतली असती तर पोपट वाचले असते. याबाबत कारवाईसाठी पाठपुरावा करणार आहे. 
- एस. टी. ढाकवळ, वन परिमंडळ अधिकारी, खोपोली 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 15 parrots die while cutting tree