पालिकेच्या तिजोरीत 1 हजार 670 कोटी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 मे 2017

नवी मुंबई - 2016-17 या चालू वर्षात सर्व स्थानिक करांच्या माध्यमातून सुमारे एक हजार कोटींची विक्रमी वसुली करणारी नवी मुंबई महापालिका ठरली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मालमत्ता व एलबीटी करात सुमारे 300 कोटींची वाढ होऊन पालिकेच्या तिजोरीत 1 हजार 670 कोटी जमा झाले आहेत. दोन्ही विभागाने राबवलेल्या प्रभावी मोहिमांमुळे मोठ्या प्रमाणात थकित व नियमित वसुली होऊ शकली आहे. 2015-16 या वर्षात महापालिकेने 870 कोटी रुपये इतकी वसुली केली होती. 

विविध करांच्या माध्यमातून गोळा केल्या जाणाऱ्या महसुलावर महापालिकेच्या आस्थापनासह नागरिकांना सुविधा देता येतात. ज्या महापालिकेची वसुली सर्वाधिक आहे, त्या महापालिकेची आर्थिक स्थिती सर्वांत मजबूत असून, त्यांचा विकासकामांचा धडाका सुरू असतो. हे सूत्र लक्षात घेत महापालिकेच्या मालमत्ता, स्थानिक स्वराज्य संस्था, व उपकर या विभागांनी 2016-17 मध्ये थकित व नियमित वसुलीसाठी प्रभावी मोहीम राबवली होती. 

परिणामी, महापालिकेने 2016-17 या चालू वर्षात एक हजार 22 कोटी 41 लाखांची वसुली केल्याची माहिती मालमत्ता कर विभागातून मिळाली आहे. यात 883 कोटी 51 लाख इतकी प्रत्यक्ष करवसुली असून, 138 कोटी 90 लाख इतकी जानेवारी, फेब्रुवारी व मार्च महिन्यांत सरकारकडून महापालिकेला मिळालेला निधी आहे. तर 2015-16 मध्ये मालमत्ता करात मिळालेल्या 507 कोटी रकमेत 140 कोटी इतक्‍या रकमेची वाढ होऊन 647 कोटी रुपये रक्कम मालमत्ता करापोटी जमा झाली आहे. 

विशेष म्हणजे, स्थानिक स्वराज्य संस्था कर बंद होऊनही या विभागाने वर्षभरात 152 कोटींची एलबीटी गोळा केल्याने महापालिकेच्या उत्पन्नात चांगली वाढ झाली आहे. यावर्षी 1 लाख 6 हजार 800 कर निर्धारणा करण्यात आली. हा आकडा मागील वर्षाच्या कर निर्धारणेपेक्षा दुपटीने जास्त आहे. तर 2015-16 या वर्षात मालमत्ता व स्थानिक संस्था करातून महापालिकेकडे 1 हजार 377 कोटी रुपये जमा झाले होते. 

अशी झाली वसुली 
महापालिकेने एक हजार कोटींचा टप्पा पार करण्यासाठी महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने काही कठोर पावले उचलली होती. यात सुमारे एक हजार 100 थकबाकीदारांची खाती गोठवण्यात आली होती. जुन्या व्यापाऱ्यांना शोधून त्यांच्याकडून तब्बल 70 कोटी रुपयांची थकित वसुली करण्यात आली. महापालिकेच्या दोन्ही विभागांतील कर्मचाऱ्यांनी विशेष मोहिमा सुरू करून 65 मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली. तर नोटाबंदीचाही महापालिकेला फायदा झाला आहे. या काळात 500 व एक हजार रुपयांच्या जुन्या नोटांतून महापालिकेला 53 दिवसांत 52 कोटींची वसुली करता आली.

Web Title: 1,670 crores for the municipal corporation