मोनो रेल्वेच्या १७ स्थानकांवर लवकरच आसने

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जून 2019

मुंबई - मोनो रेल्वे प्रवाशांच्या सोईसाठी स्थानकांवर बसण्यासाठी बाकडे, खुर्च्या बसवण्याचा निर्णय मुंबई महानगर शहर विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घेतला आहे. मोनो रेल्वेच्या सर्व १७ स्थानकांवर प्रवाशांची बैठक व्यवस्था उभारण्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. आता ४३ लाख ६१ हजार रुपयांचा प्रस्तावित खर्च असल्याचे एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे.

मोनो रेल्वेच्या दोन ट्रेनमधील वेळ कमी व्हावा, तसेच ट्रेनच्या फेऱ्या (फ्रिक्वेन्सी) वाढाव्यात यासाठी वर्षभरापासून प्रयत्न सुरू होते. ही परिस्थिती महिन्याअखेरीस सुधारेल असे चित्र आहे. कारण मोनो रेल्वेचे नादुरुस्त डबे ३० जूनपर्यंत पुन्हा सेवेत दाखल होणार आहेत. सध्यस्थितीत मोनो रेल्वेच्या दोन ट्रेनमधील अंतर २५-३० मिनिटे इतके आहे. यादरम्यान प्रवाशांना नाहक ताटकळत उभे राहावे लागते. विशेषतः अपंग व गरोदर महिलांना याचा खूप त्रास होत असल्याने लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी होत होती, त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. कंत्राट मिळणाऱ्या कंपनीला तीन महिन्यांत या १७ स्थानकांवर प्रवासी बैठक व्यवस्था तयार करून द्यावी लागणार आहे. १९ जूनपर्यंत निविदा भरता येणार असून, सर्वांत कमी निविदा रक्कम भरणाऱ्या कंपनीला कंत्राट दिले जाणार आहे.

अगोदर आसने का नव्हती?
मोनो रेल्वे अतिशय चिंचोळ्या भागातून जाते. त्यांच्या स्थानकांची जागाही कमी आहे. त्यामुळे ‘मोनो’तून उतरणाऱ्या प्रवाशांनी लगेचच स्थानक सोडावे या उद्देशाने स्थानके बांधताना प्रतीक्षा खुर्च्या बसवल्या नाहीत, असे कारण एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दिले; मात्र मोनो प्रवाशांची गरज लक्षात घेता ही व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 17 mono rail stations shortly Seats