रेल्वेच्या मदतीला एसटी; मुंबई-पुणे मार्गावर धावणार 180 ज्यादा बसेस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

-  मुंबई-पुणे मार्गावरील दुरुस्तीसाठी 25 जुलै ते 10 ऑगस्ट दरम्यान बहुतांश रेल्वेगाड्या करण्यात आल्या रद्द. 

मुंबई : मुंबई-पुणे मार्गावरील दुरुस्तीसाठी 25 जुलै ते 10 ऑगस्ट दरम्यान बहुतांश रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाने ज्यादा बसेस सोडाव्यात, असे निर्देश परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी गुरुवारी (ता.15) दिले. त्यानुसार एसटी प्रशासनाने मुंबई, ठाणे, पुणे, येथून नियमित बसेस व्यतिरिक्त दररोज 180 ज्यादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. तसेच मुंबई-पुणे मार्गावर शिवनेरीच्या जादा 24 फेऱ्या सुरु करण्यात आले आहे.   

मध्य रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीसाठी मुंबई, पुणे, मिरज, सांगली, कोल्हापूर या मार्गावरील विविध रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. या मार्गावर दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटीने मुंबई विभागातून 50, ठाणे विभागातून 50, पुणे विभागातून 70, आणि मिरज, सांगली व कोल्हापूर विभागातून 10 अशा 180 ज्यादा बसेस दररोज सोडण्याचे नियोजन केले आहे.

उपरोक्त बसस्थानकात ज्यादा बसेसचे नियोजन करण्यासाठी समन्वय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त प्रवासी मागणीनुसार त्या-त्या बसस्थानकावरून विशेष बसेस सोडण्यात येतील, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 180 more buses will run on Route of Mumbai Pune