उरणमध्ये आढळले २ कोरोना पॉझिटिव्ह; JNPT मध्ये भीतीचं वातावरण....

सकाळ वृत्तसेवा
Monday, 13 April 2020

देशासह महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत चालला आहे. त्यात मुंबई आणि उपनगरांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. आता उरणमध्ये जेएनपीटीच्या भागात २ जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जेएनपीटीमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय.

मुंबई : देशासह महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत चालला आहे. त्यात मुंबई आणि उपनगरांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. आता उरणमध्ये जेएनपीटीच्या भागात २ जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जेएनपीटीमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय.

जेएनपीटी म्हणजेच जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट हे देशातलया काही सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक आहे. जेएनपीटीमध्ये शेकडो जहाजं येतात. लाखो टन सामानाची ने-आण इथून केली जाते. त्यामुळे इथे शेकडो कर्मचारी काम करतात. मात्र आता इथेच राहणाऱ्या २ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे इथे राहणाऱ्या आणि काम करणाऱ्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

मोठी बातमी -  मुंबईतील सर्वांत मोठ्या नायगाव पोलिस वसाहतीसह मरोळ, वरळी पोलिस वसाहत सील

उरणमध्ये जेएनपीटीच्या वसाहतीत राहणाऱ्या CISF जवानाच्या ४० वर्षीय पत्नीला कोरोना झाल्याचं स्पष्ट झालंय. तर बंदराजवळ राहणाऱ्या ३० वर्षांच्या एका व्यक्तीला डेंग्यूच्या संशयातून भरती करण्यात आलं होतं. मात्र त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. हा व्यक्ती वकील आहे. शनिवारी या दोघांचे रिपोर्ट आल्यानंतर यांना बेलापूरच्या अपोलो रुग्णालयात त्यांना भरती करण्यात आलंय.

अत्यावश्यक सेवा असल्यामुळे लॉकडाऊन असूनही बंदरावर सामान उतरवण्यासाठी आणि चढवण्यासाठी शेकडो कर्मचारी काम करत आहेत. त्यामुळे आता प्रशासनाकडून या दोघांच्या संपर्कात आलेल्यांची यादी तयार करण्याचं आणि त्यांचं विलगीकरण करण्याचं काम सुरु आहे.      

मोठी बातमी - कोरोनाची धास्तीमुळे  मुंबई, पुण्यातील मुलगा नको गं बाई ! 

उरण नगरपरिषदेच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांआधी एका लहान मुलीची प्रकृती बरी नसल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यात तिची आणि तिच्या आईची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यात मुलीचे रिपोर्ट नेगेटिव्ह तर तिच्या आईचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

दरम्यान अधिकाऱ्यांकडून या कुटुंबाच्या संपर्कात असणाऱ्या १७ जणांचे नमुने घेण्यात आले आहेत. रिपोर्ट आल्यानंतर प्रशासनाकडून पुढची पावलं उचलण्यात येणार आहेत.उरणमध्ये २ रुग्ण आढळल्यामुळे नवी मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा ३९ वर पोहोचला आहे.

2 corona positive cases found in uran JNPT area


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2 corona positive cases found in uran JNPT area