मुंबईतील सर्वांत मोठ्या नायगाव पोलिस वसाहतीसह मरोळ, वरळी पोलिस वसाहत सील

सकाळ वृत्तसेवा
Monday, 13 April 2020

महापालिकेचे 12 पोलिस वसाहतींवर विशेष लक्ष 

मुंबई : कोरोनाच्या फैलावामुळे मुंबई पोलिसांच्या तीन वसाहती सील करण्यात आल्या आहेत. शहरातील सर्वांत मोठ्या नायगाव पोलिस वसाहतीसह मरोळ, वरळी येथील बीडीडी चाळ पोलिस वसाहतीतील एक इमारत अशी तीन ठिकाणे सील करण्यात आहेत. त्याचप्रमाणे आणखी 12 पोलिस वसाहतींवर विशेष लक्ष ठेवले जात आहे.

नायगाव पोलिस मुख्यालयातील शिपायाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्याच्या संपर्कातील व्यक्तींना विलगीकरण कक्षात हलवण्यात आले आहे. त्याचे निवासस्थान असलेली इमारत सील करण्यात आली असून, तेथील अन्य रहिवाशांना जीवनावश्‍यक वस्तू घरपोच दिल्या जाणार आहेत. त्यासाठी दोन सहायक पोलिस निरीक्षक, एक हवालदार आणि तीन सहायक फौजदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. नायगाव पोलिस वसाहतीत सुमारे 10 हजार कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांचे वास्तव्य आहे. 

मोठी बातमी - कोरोनाची धास्तीमुळे  मुंबई, पुण्यातील मुलगा नको गं बाई ! 

बांगूरनगर पोलिस ठाण्यातील एका पोलिस शिपायाला कोरोनाची बाधा झाल्याचे सांगण्यात आले. त्याचे वास्तव्य असलेली नायगाव पोलिस वसाहत महापालिकेने सील केली आहे. या पोलिसासह त्याच्या संपर्कातील व्यक्तींना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. यापूर्वी कुरार येथे एका पोलिस उपनिरीक्षकाला कोरोनाची लागण झाल्यावर त्याचे निवासस्थान असलेली बोरिवलीतील इमारत सील करण्यात आली होती. मरोळ आणि वरळी बीडीडी चाळ येथील पोलिस वसाहतींमध्येही काही संशयित रुग्ण आढळले आहेत. 

मुंबईतील 12 पोलिस वसाहतींवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. त्यापैकी आठ वसाहती कर्मचाऱ्यांच्या, तर चार वसाहती अधिकाऱ्यांच्या आहेत. वैद्यकीय पथके एका दिवसाआड या वसाहतींमध्ये जाऊन रहिवाशांची तपासणी करत आहेत. कोरोनासदृश लक्षणे आढळलेल्या व्यक्तींवर तात्काळ उपचार करण्यात येत आहेत. सर्व पोलिस वसाहतींचे दरवाजे बंद करण्यात आले असून, येणाऱ्या-जाणाऱ्यांची काटेकोर तपासणी केली जात आहे. 

मोठी बातमी -  तुमच्या सोसायटीत ताजा भाजीपाला हवाय? मग वापरा हा फंडा! वाचा सविस्तर...

25 रेल्वे पोलिसांचे अहवाल निगेटिव्ह : 

सीएसएमटी रेल्वे पोलिस ठाण्यातील 51 वर्षीय पोलिसाला कोरोनाची लागण झाल्यानंतर 15 ते 27 मार्चदरम्यान त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व 25 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. विलगीकरण केंद्रात ठेवलेल्या या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्याशिवाय रेल्वे पोलिस दलातील एक कर्मचारी अंधेरीतील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार घेत असून, त्याचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

biggest nigaon police quarters in mumbai is sealed due to corona threat


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: biggest nigaon police quarters in mumbai is sealed due to corona threat