आणखी 20 दिवस भाजीपाल्याचे दर गगनालाच... 

आणखी 20 दिवस भाजीपाल्याचे दर गगनालाच... 

ठाणे : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांची आवक चांगली असली, तरी भाज्यांचे दर हे घाऊक बाजारात चढेच आहेत. पावसामुळे भाजीपाला खराब होण्याचे प्रमाण वाढल्याने भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. आणखी 20 दिवस भाज्यांची दरवाढ कायम राहणार असल्याचे घाऊक विक्रेत्यांनी सांगितले. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी एकूण 156 ट्रक दाखल झाले असले, तरी त्यात टोमॅटोचे अवघे 8; तर कांदा बटाटाचे 9 ट्रक होते. कांद्याचे दर आणखी तीन-चार महिने चढेच राहतील; परंतु कांदाटंचाईचा सामना वर्षभर नागरिकांना करावा लागण्याची शक्‍यता विक्रेत्यांनी वर्तवली. 

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत नगर, जुन्नर, नाशिक, नारायणगाव, मुरबाड आदी भागांतून भाजीपाला दाखल होतो. या परिसरात झालेल्या परतीच्या पावसाचा परिणाम अजूनही जाणवत असून भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. पावसाने आता उघडीप दिली असली तरी शेतातील बहुतांश माल हा खराब झालेला आहे. नवीन उत्पादन येण्यास आणखी काही दिवस लागणार आहेत. बाजार समितीत गुरुवारी 156 ट्रक मालाची आवक झाली. यात महाराष्ट्रातील 140 व बाहेरील राज्यातील 16 ट्रक होते. 

भाजीपाल्याचे एकूण 64 ट्रक, तर पालेभाजीचे 13 ट्रक दाखल झाले आहेत. भाज्यांची आवक चांगली असली, तरी नाशवंत माल जास्त असल्याने भाज्यांचे दर चढे आहेत. भाज्यांच्या किमतीत महिना-दीड महिन्याच्या कालावधीनंतर उतार झाल्याचे पाहायला मिळेल. शेतकऱ्यांनी पुन्हा भाजीपाल्याची लागवड केली असून उत्पादन येण्यास महिनाभराचा कालावधी जाण्याची शक्‍यता बाजार समितीचे यशवंत पाटील यांनी वर्तवली. 

माल खरेदी केला तरी तो एक ते दोन दिवसांत सर्वच्या सर्व विकला जात नाही. दोन दिवसांत भाजीपाला हल्ली खराब होत असून तो विक्री करणे परवडत नाही. 
- श्‍यामल मवाळ, 
किरकोळ विक्रेते 

भाजीपाला इतका महाग झाला आहे की, तो खराब होऊन पैसे वाया जाण्याऐवजी रोज एखाद-दुसरी भाजी विकत आणून ती बनविली जाते. कांदा तर घरात पुरवूनच वापरला जाऊ लागला आहे. फ्रिजमध्ये भाजी ठेवली, तरी ती दोन ते तीन दिवसांत खराब होते. त्यामुळे आठवड्याभराची भाजी खरेदी करूनही ठेवता येत नाही. 
- कविता चौधरी, गृहिणी 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com