ठाणे पालिकेचे 200 कोटी कचऱ्यात! 

राजेश मोरे
मंगळवार, 17 डिसेंबर 2019

ठाणे महापालिकेच्या गेल्या सर्वसाधारण सभेत दिवा येथील डम्पिंग ग्राऊंडवर शास्त्रोक्त पद्धतीने कचरा विल्हेवाटीच्या प्रस्तावाला मोठ्या प्रमाणात विरोध झाल्याने हा प्रस्ताव तहकूब करण्यात आला होता. तब्बल 218 कोटी 50 लाख रुपयांचा हा प्रस्ताव पुन्हा नव्याने प्रशासनाच्या वतीने पुढील सर्वसाधारण सभेत सादर करण्यात येणार आहे.

ठाणे : ठाणे महापालिकेच्या गेल्या सर्वसाधारण सभेत दिवा येथील डम्पिंग ग्राऊंडवर शास्त्रोक्त पद्धतीने कचरा विल्हेवाटीच्या प्रस्तावाला मोठ्या प्रमाणात विरोध झाल्याने हा प्रस्ताव तहकूब करण्यात आला होता. तब्बल 218 कोटी 50 लाख रुपयांचा हा प्रस्ताव पुन्हा नव्याने प्रशासनाच्या वतीने पुढील सर्वसाधारण सभेत सादर करण्यात येणार आहे. मुळात यापूर्वीचा प्रस्ताव हा येथील जमिनीच्या वापराचा फेरबदलाचा प्रस्ताव होता. हा प्रस्तावच अद्याप मंजूर करण्यात आलेला नाही. फेरबदलाचा प्रस्ताव मंजूर झालेला नसताना थेट कोट्यवधीच्या कामाचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत येणार असल्याने त्यावरून पुढील सर्वसाधारण सभेत गोंधळ होण्याची शक्‍यता आहे. 

दिवा येथे खासगी जागेत महापालिकेकडून कचरा टाकला जातो. पण हा कचरा बेकायदेशीरपणे टाकला जात आहे. त्याला कायदेशीर रुप देण्याचा दावा करून महापालिका प्रशासनाच्या वतीने हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. गेल्या सर्वसाधारण सभेत चुकीच्या पद्धतीने हा प्रस्ताव सादर करण्यात आल्याचा आक्षेप सर्वपक्षीय नगरसेवकांनी घेतला होता. त्यामुळे या प्रस्तावात नव्याने फेरबदल करून तो सर्वसाधारण सभेसमोर सादर केला जाणार आहे.

डम्पिंग ग्राऊंडवर योग्यप्रकारे कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नसल्याने राज्य प्रदूषण महामंडळाकडून पालिकेला नोटीस बजाविण्यात आली आहे. चुकीच्या पद्धतीने सुरू असलेले हे डम्पिंग ग्राऊंड बंद न केल्यास महापालिकेला तब्बल 50 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्याचा इशारा दिला आहे. तसेच त्यानंतर प्रत्येक दिवशी पाच लाख रुपये दंडात्मक कारवाई करण्याची तंबी दिली आहे. त्यामुळेच शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी तब्बल 218 कोटी 50 लाखांचा खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. 

गेल्या वेळेस सत्ताधारी शिवसेनेने विरोधकांना या विषयावर पाठिंबा देत प्रशासनाचा हा विषय रोखून धरला होता. पण आता नव्याने हा विषय प्रशासनाच्या वतीने सर्वसाधारण सभेत सादर होत असल्याने यावेळी कितीही विरोध झाला तरी हा प्रस्ताव मंजूर करण्याची रणनिती सत्ताधारी शिवसेनेकडून आखली गेल्याची चर्चा आहे. 

  • दिवा येथील डम्पिंग ग्राऊंडवर महापालिका क्षेत्रतील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावून त्याठिकाणी खेळाचे मैदान अथवा उद्यान उभारण्याचा प्रशासनाचा विचार आहे. त्यासाठीच आरक्षण फेरबदलाचा प्रस्ताव महापालिकेकडून सादर करण्यात आला होता. मात्र, त्यामध्ये "घनकचरा व्यवस्थापन' असा उल्लेख झाल्याने या ठिकाणी नव्याने डम्पिंग ग्राऊंड उभारले जात असल्याचा संशय निर्माण झाला होता. 
  • दिवा येथे 4 ठिकाणी घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येत होती. त्यापैकी 3 ठिकाणच्या जागेवर यापुढील काळात कचरा टाकणे शक्‍य नाही. त्यामुळे सध्या एकाच जागेवर कचरा टाकला जात आहे. ज्या ठिकाणी कचरा टाकण्याचे काम बंद करण्यात आले, त्याठिकाणी आतापर्यंत सुमारे 23 लाख टन कचरा टाकण्यात आला आहे. 
  • दिवा डम्पिंग खाडीकिनारी असल्याने ते आता शास्त्रोक्त पध्दतीने बंद करून त्याचा वापर पर्यावरणपुरक करण्याच्या दृष्टीने तीन भूखंडांवर बायोमाइनिंग किंवा कॅपिंग पद्धतीने डम्पिंग बंद करण्याचा प्रशासनाचा विचार आहे. मात्र शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी किमान पाच वर्षांचा कालावधी लागण्याची शक्‍यता आहे. या कामासाठी तब्बल दोनशे कोटींपेक्षा जास्त रकमेचा प्रस्ताव प्रशासनाच्या वतीने तयार करण्यात आला आहे. 
     

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 200 crore of Thane municipality in waste!