कडकनाथमुळे कडकी

कडकनाथ
कडकनाथ

अलिबाग ः स्वादिष्ट आणि पौष्टिक आहार म्हणून राज्यात कडकनाथ कोंबडीचा गवगवा झाला आहे. त्यामुळे अधिक नफा मिळेल या अपेक्षेने रायगड जिल्ह्यात कुक्कटपालन व्यावसायिकांनी तिला पसंती दिली होती. मात्र, काही महिन्यांपासून तिच्या मागणीत झपाट्याने घट होत असल्याने हे व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत. काहींसमोर या कोंबड्यांना खाद्य पुरवण्याएवढेही पैसे नसल्याने ते हताश झाले आहेत. जिल्ह्यातील सव्वाशेपेक्षा अधिक व्यावसायिकांनी यामध्ये 80 लाखांपेक्षा अधिक रक्कम गुंतवली आहे. 

रायगड जिल्ह्यातील पोल्ट्री व्यवसाय अनेक संकटांवर मात करून तग धरून आहे. "कडकनाथ'ला राज्यात मोठी प्रसिद्धी मिळाल्यानंतर ब्रॉयलर कोंबडी पालन करणाऱ्या 15 पेक्षा अधिक व्यावसायिकांनी अधिक नफा मिळेल, या अपेक्षेने बॅंक, पतसंस्थांची कर्जे घेऊन हा व्यवसाय सुरू केला. काहींनी उसनवारी करत यात गुंतवणूक केली. परंतु, ते सपशेल अपयशी ठरले आहेत. या कोंबड्यांना अधिक भाव असल्याने मागणी घटली आहे. त्यामुळे कोंबड्यांसह शिल्लक राहिलेल्या अंड्यांचे करायचे काय, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर उभा आहे. आता तर देखभाल, खाद्य, मजूर आणि औषधांच्या खर्चाची तरतूद करणेही अशक्‍य झाले आहे, त्यामुळे ते हताश झाले आहेत. 

कडकनाथ कोंबडी पलन आणि विक्री व्यवसायात मोठे 15 पेक्षा अधिक व्यावसायिक आहेत; तर लहान विक्रेत्यांची संख्या 125 पेक्षा अधिक आहे. 

अर्थकारण असे बिघडले 
कडकनाथ कोंबडीची सव्वा दोन किलोपर्यंत वाढ होण्यासाठी किमान सहा महिने लागतात. त्यावेळी तिला बाजारात सुमारे एक हजार रुपयांपर्यंत किंमत मिळते. पण 60 रुपये दराने पिल्लू घेतल्यानंतर सहा महिन्यांसाठी खाद्य म्हणून सुमारे चार किलो धान्य लागते. यासाठी 360 रुपयांपर्यंत खर्च येतो. देखभाल खर्च, वीज, पाणी, मजुरी यांच्यासाठी साधारण दीडशे ते दोनशे रुपये खर्च येतो. काही पक्षी वाढ होतानाच दगावतात. यामुळे पूर्ण वाढ झालेल्या कोंबडीसाठी किमान पाचशे ते साडेपाचशे रुपये खर्च येतो. मात्र, या कोंबड्यांची विक्री वेळेत होत नसल्याने हा खर्च परवडत नाही. 

अशी आहे कडकनाथ 
कडकनाथचे स्थानिक नाव "कालामासी' असे आहे. त्याचा अर्थ काळे मांस असलेली कोंबडी. संपूर्ण काळ्या रंगाच्या या कोंबडीचे रक्त आणि मांसही काळे असते. मध्य प्रदेशातील झाबुआ आणि धार जिल्हा आणि राजस्थान तसेच गुजरातलगतचे जिल्हे मिळून अंदाजे 800 चौरस मैलांचा प्रदेश या जातीचे मूळ उगमस्थान समजले जाते. आदिवासी, स्थानीय निवासी आणि ग्रामीण गरीब लोक बहुतांशी या जातीच्या कोंबड्या पाळतात. 

कडकनाथ जातीच्या कोंबडीचा मोठा गाजावाजा करण्यात आला होता. त्यामुळे मोठ्या अपेक्षेने या व्यवसायात गुंतवणूक केली. परंतु, मालाचा उठाव होत नसल्याने मिळेल त्या दरात सर्व पक्षी विकावे लागले. यातून फायदा तर नाहीच; परंतु तोटाच जास्त झाला. 
- विनायक धामणे, पोल्ट्री व्यावसायिक, रोहा 

कडकनाथ कोंबडीचे मांस खूपच चांगले असते. परंतु इमू पालनाप्रमाणे या व्यवसायाची परिस्थिती झालेली आहे. बाजारातून किती मागणी होईल याचा आभ्यास करून गुंतवणूक न केल्याने हा प्रकार झाला असावा. यातच पक्षी उत्पादक कंपन्यांनी माल संपला जावा यासाठी पोल्ट्री व्यावसायिकांना चुकीची माहिती दिली. 
- गणेश भगत, सरचिटणीस, रोहा तालुका शेतकरी विकास प्रतिष्ठान 

पुण्यातून एक किलो वजानाच्या 375 रुपये दराने कडकनाथ कोंबड्या आणल्या होत्या. सहा महिन्यात त्यांची वाढ अडीच किलोच्या आसपास झालेली आहे. परंतु, येथील ग्राहक साधारण हजार ते बाराशे रुपयांपर्यंतही या कोंबड्या विकत घेण्यास तयार होत नाही. त्यामुळे तोटा सहन करावा लगतो. 
- सुप्रिया देशपांडे, जिजामाता कृषी भूषण 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com