ठाण्यात दिवसभरात 22 वृक्ष कोसळले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

तलावपाळी आणि अल्मेडा रस्त्यावर वाहतूक कोंडी

ठाणे : मंगळवारी ठाण्यात दिवसभर सुरु असलेल्या मुसळधार पावसाने तब्बल 22 ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या आहेत. वृक्ष कोसळल्याने तलावपाळी आणि अल्मेडा रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. तर, वृक्ष कोसळून काही वाहनांचे नुकसान झाले असून मागील 12 तासांत ठाण्यात 49.74 मिमी पावसाची नोंद ठाणे मनपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने केली आहे.

मंगळवारी दिवसभराच्या मुसळधार पावसाने ठाणेकरांचे जनजीवन विस्कळीत झाले. शहरात ठाणे बेलापूर रोड, राबोडी पोलिस ठाण्याच्या समोर श्रीरंग सोसायटी, वागळे रोड क्र. 34, विम्बल्डन पार्क, सोसायटी सत्कार हॉटेल पोखरण रोड , विठ्ठल मंदिर, खारेगाव यासह विविध 22 ठिकाणी वृक्ष कोसळले. यामुळे रस्त्यावरील वाहतुकीचा बट्याबोळ झाल्याचे चित्र होते.

ठाण्याच्या लोढा फेडरेशन आणि लोढा पॅराडाईज येथे झाड पडून मीरा जाधव यांची कार आणि वसीम लुलानिया यांच्या दुचाकीचे नुकसान झाले. शिवाजी पथ, तलाव पाळी, ठाणे येथे झाड पडून एका रिक्षाचे नुकसान झाले. विजयनगरी वाघबीळ घोडबंदर रोडवर मारुती सुझुकी स्विफ्ट कारवर झाड पडल्याने कारचे नुकसान झाल्याची नोंद आपत्ती व्यवस्थापनाकडे करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 22 trees collapse in Thane