समुद्राच्या घशात सुपीक जमीन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

जूनपासून अरबी समुद्रात 3 वादळे निर्माण झाली आहेत. त्यामुळे समुद्राच्या पोटात खूप मोठ्या प्रमाणात उलथापालथ झाली असल्याचे बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तर या वादळानंतर लाटांचा मारा होऊन किनारपट्टीची धूप होत आहे. 

अलिबाग : रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीवर असणारे रुपेरी वाळू आणि स्वच्छ दिसणारे समुद्रकिनारे हे लाटांच्या माऱ्यामुळे विद्रूप झाले आहेत. त्याचा परिणाम पर्यटन, किनारी भागातील मासेमारीवर होण्याची दाट शक्‍यता आहे. दोन-तीन वर्षांपासून गावामध्ये पाणी घुसण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यात सुपीक जमीनही नष्ट होत असल्याने रहिवासी भयभीत झाले आहेत. 

जूनपासून अरबी समुद्रात 3 वादळे निर्माण झाली आहेत. त्यामुळे समुद्राच्या पोटात खूप मोठ्या प्रमाणात उलथापालथ झाली असल्याचे बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तर या वादळानंतर लाटांचा मारा होऊन किनारपट्टीची धूप होत आहे. 
लाटा काही ठिकाणी नागरी वस्तीत शिरल्या. चार ते साडेचार मीटर उंचीच्या लाटांचे तांडवनृत्य किनारपट्टीवर पाहायला मिळाले. बाजार, वस्ती, घरे, विद्युतखांब, संरक्षक बंधारे अशा सगळ्यांनाच या अजस्र लाटांचा जोरदार फटका बसलेला आहे. बंधाऱ्यांचे दगड उचलून दूरवर फेकून दिले आहेत. त्यामुळे किनारपट्टीवरील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

20 वर्षांतील सर्वात मोठी धूप 
काशिद समुद्रकिनारा रुपेरी वाळूसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, आता या किनाऱ्यावरील वाळू वाहून गेलेली आहे. मागील 20 वर्षातील ही सर्वात मोठी धूप आहे. यापूर्वी इतक्‍या प्रमाणात वाळू नाहूशी झाल्याचे आम्ही पाहिले नसल्याचे येथील व्यावसायिकांचे म्हणणे आहे. किनाऱ्यावर आता दगडगोटे दिसू लागले आहेत. 

बंधाऱ्यासाठीही परवानग्यांचा त्रास 
समुद्रकिनारा भागाची धूप थांबवावी यासाठी मेरिटाईम बोर्डाकडून धूपप्रतिबंधक बंधारे बांधले जातात. परंतु हे बंधारे बांधण्यासाठी सीआरझेडच्या किचकट निकषातून जावे लागते. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था, नियोजन मंडळाच्या परवानग्या घ्याव्या लागतात. 

यंदा पावसाळ्यात वारंवार वादळे आली. त्यामुळे लाटांचा जोर अधिक होता. लाटा किनाऱ्याची वाळू आपल्याबरोबर समुद्राच्या पोटात घेऊन जातात. ही वाळू काही दिवसात परत येऊ शकते. परंतु आताची झालेली धूप ही अधिक प्रमाणात आहे. 
- मनोहर बैले, सागरकन्या मच्छीमार संस्था 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा