शिल्पा शेट्टीकडून 24 लाखांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

भिवंडी - ऑनलाइन शॉपिंग कंपनीद्वारे ग्राहकांना मालाचा पुरवठा करण्यासाठी व्यापाऱ्याकडून बेडसीटची खरेदी करून 24 लाखांचा अपहार केल्याप्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी व तिचा पती राज कुंद्रा या दांपत्यासह पाच जणांच्या विरोधात भिवंडी तालुक्‍यातील कोनगाव पोलिस ठाण्यात गुरुवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. दर्शीत इंद्रवन शहा, उदय कोठारी, वेदांत विकास बाली (रा. मुंबई) अशी अन्य संचालकांची नावे आहेत. या सर्वांनी 2014 मध्ये बेस्ट डील टीव्ही प्रा.लि.या ऑनलाइन शॉपिंग कंपनीची स्थापना केली आहे. या कंपनीद्वारे ग्राहकांना विविध प्रकारच्या मालाची विक्री केली जाते. या कंपनीने भिवंडी तालुक्‍यातील सरवली एमआयडीसीतील भालोटिया एक्‍सपोर्ट कंपनीकडून जुलै 2015 ते मार्च 2016 व जुलै 2016 ते ऑगस्ट 2016 या कालावधीत एक कोटी 54 लाख किमतीच्या बेडसीट खरेदी केल्या होत्या. भालोटिया एक्‍सपोर्ट कंपनीचे मालक रवी मोहनलाल भालोटिया यांचे उर्वरित 24 लाख 12 हजार 877 रुपये देण्यास टाळाटाळ करीत आहे. मालाचे पैसे मिळण्यासाठी भालोटिया यांनी शिल्पा शेट्टीसह पाचही जणांची अनेकवेळा भेट घेतली. मात्र या सर्वांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने भालोटिया यांनी पोलिस ठाण्यात तक्रार केली.
Web Title: 24 lakh cheating by shilpa shetty