esakal | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा पोलिसांना जबर फटका

बोलून बातमी शोधा

Police
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा पोलिसांना जबर फटका
sakal_logo
By
अनिश पाटील

मुंबई: कोविड योद्धे असलेल्या पोलिसांवरही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव पडला असून गेल्या 15 दिवसांत राज्यात 25 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. गेल्या वर्षापासून नागरिकांच्या सुरक्षेसाठी अविरत बंदोबस्त करणाऱ्या राज्य पोलिस दलातील 389 पोलिसांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनाच्या दुस-या लाटेत कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना राज्य पोलिस दलात 15 दिवसांत 25 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यातील सर्वाधिक म्हणजे 4 पोलिसांचा मृत्यू उस्मानाबाद येथे झाला आहे. त्या पाठोपाठ परभणीत 3, मुंबईत 3, नाशिक शहरात दोन व नवी मुंबई, पुणे शहर, नागपूर शहर, नंदुरबार, बीड, नांदेड, धुळे, लातूर, पुणे रेल्वे पोलिस व महाराष्ट्र सायबर येथे प्रत्येकी एका पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय राज्य राखीव पोलिस दलाच्या जालना, धुळे व हिगोंली येथील विभागात प्रत्येकी एक असा तीन पोलिसांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा: शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स ४८ हजारांवर

राज्यात 55 वर्षांवरील पोलिसांना कार्यालयीन कामेच देण्यात सांगण्यात आले आहे. याशिवाय आतापर्यंत 80 टक्के पोलिसांना कोरोनाची पहिली लस व 40 टक्के पोलिसांना कोरोनाची दुसरी लस देण्यात आली आहे. तसेच पोलिसांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आवश्यक औषधांचे वितरण करण्यात येणार आहे. याशिवाय मास्क व सॅनेटायझरचे वाटप करण्यात आल्याचे एका अधिका-याने सांगितले. गेल्या वर्षी कोरोनाचा कहर वाढला होता. त्यावेळी मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर यासारख्या शहरी भागांमधील पोलिस अधिक बाधीत झाले होते. पण यावेळी छोटी शहरे व ग्रामीण भागातील पोलिसांनाही तेवढ्याच प्रमाणात बाधा होत आहे. ही बाब गंभीर असून सर्व पातळ्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा: समजून घ्या लोकल ट्रेनमधुन कोणाला प्रवासाची परवानगी

गेल्या वर्षी मार्चपासून राज्यात 389 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यातील सर्वाधीत मृत्यू मुंबईत 103 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पण गेल्या वर्षीच्या तुलनेत मुंबईतील कोरोना बाधीत पोलिसांची संख्या कमी आहे. पण सामान्य नागरीकांमध्ये कोरोनाचा आकडा वाढत असल्यामुळे रुग्णालयात खाटा मिळवणे कठीण झाले आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी चारही कोविड सेंटर पुन्हा करण्याचा निर्णय घेतला आहे.याशिवाय सहा ठिकाणी मुंबईत कोविड तपासणी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. पाच हेल्पडेस्कही सक्रिय असल्याचे अधिका-याने सांगितले. मुंबई पाठोपाठ ठाण्यात 34, नागपूरमध्ये 21 , पुणे शहरात 13 , नवी मुंबईत 12 , नाशिक ग्रामीणमध्ये 10 व नाशिक शहरमध्ये 11 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

(संपादक- विराज भागवत)