ठाणे जिल्ह्याची पाणीटंचाईतून सुटका? जिल्हा परिषदेने आखली 'ही' योजना

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 मे 2020

ग्रामीण भागात भेडसावणारी पाणीटंचाई दूर करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात 250 बोअरवेल खोदण्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.

मुरबाड ( बातमीदार ) : ग्रामीण भागात भेडसावणारी पाणीटंचाई दूर करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात 250 बोअरवेल खोदण्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या प्रयत्नाने यंदा नवीनच सुरू केलेल्या योजनेनुसार जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड , भिवंडी तालुक्यातील काही गावांना याचा फायदा होणार आहे.

मोठी बातमी ः Lockdown : मुंबईत 'सीआरपीएफ'ची पथके दाखल होणार?

दरवर्षी उन्हाळ्यात ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू होते. या पार्श्वभूमीवर उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी अर्थसंकल्पात सेसमधून एक कोटी रुपयांची तरतूद केली होती व त्यातून यंदाच्या उन्हाळ्यात टंचाईग्रस्त गावांमध्ये 250 बोअरवेल खोदण्याची योजना तयार केली होती. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा दीपाली पाटील, उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी नुकतीच अधिकारी व सदस्यांबरोबरच चर्चा केली. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य व ग्रामस्थांच्या सूचनेनुसार विविध ठिकाणी 250 बोअरवेल खोदण्यास मंजुरी देण्यात आली आहे. 

मोठी बातमी ः नवे आयुक्त ऍक्शनमध्ये ! कोरोनाला थोपवण्यासाठी 'मायक्रो प्लॅनिंग', प्रशासनाला महत्वाचे आदेश

टँकरनेही पाणीपुरवठा सुरू 
शहापूर व मुरबाड तालुक्यातील ग्रामस्थांच्या मागणीनुसार पाणी टंचाई असणाऱ्या गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्याचबरोबर बोअरवेल खोदल्या जाणार असल्यामुळे ग्रामस्थांचे हाल कमी होतील, अशी आशा सुभाष पवार यांनी व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 250 borewells will be made to supply water in thane rural area