चक्रीवादळात बुडालेल्या जहाजातील २६ मृतदेह सापडले, ५९ बेपत्ता

दुर्घटनेतील १८८ जणांना वाचविण्यात नौदलाला आलं यश
Tauktae Cyclone
Tauktae CycloneFile Photo

मुंबई : अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे बुडालेल्या जहाजातील २६ मृतदेह सापडले असून अजूनही ५९ कर्मचारी बेपत्ता आहेत. काल या दुर्घटनेतील १८८ जणांना वाचविण्यात नौदलाला यश आले आहे. ओएनजीसीचे काम कंत्राटी पद्धतीने करणाऱ्या अॅफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे हे बार्ज होते.

Tauktae Cyclone
सरकारचा WhatsAppला इशारा; नवी पॉलिसी मागे घ्या अन्यथा...

अरबी समुद्रातील हिरा तेल उत्खनन प्रकल्पातील खासगी कंपन्यांचे हे कर्मचारी होते. एरवी तेल उत्खनन फलाटांवर काम करणारे हे कर्मचारी काम संपल्यावर पी ३०५ या बार्जवर रहात असतं. सोमवारच्या वादळामुळे या जहाजाचा नांगर तुटल्याने आणीबाणीची परिस्थिती उद्भवली. नौदलाच्या नौकांनी खवळलेल्या समुद्रात तेथे येऊन बचावकार्य सुरु केले. मात्र, मंगळवारी सकाळी हे जहाज बुडाले. अनेक कर्मचाऱ्यांनी लाईफ जॅकेट घाऊन समुद्रात उड्या मारल्या तर कित्येक कर्मचारी छोट्या लाईफबोटींच्या सहाय्याने समुद्रात उतरले. या बार्जवर २७३ कर्मचारी होते यांपैकी १८८ जणांना सुखरूप वाचविण्यात नौदलाला यश आले. तर आतापर्यंत २६ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. अजूनही ५९ कर्मचारी बेपत्ता आहेत. या बचाव कार्यातील काही युद्धनौका मुंबईत परत आल्या असून नौदलाची टेहळणी विमाने व हेलिकॉप्टर यांच्या सहाय्याने उरलेल्या कर्मचाऱ्यांचा शोध सुरु आहे. कोची युद्धनौकेतून आज १८८ जणांना मुंबईत आणले गेले.

Tauktae Cyclone
म्युकरमायकोसिस महामारी घोषीत; राजस्थान सरकारचा मोठा निर्णय

पी ३०५, जीएएल कन्स्ट्रक्टर व सपोर्ट स्टेशन ३ हे अॅफकॉन इन्फ्रास्ट्रक्चरच्या बार्जवर सोमवारी वेगवेगळ्या कारणामुळे भरकटले. पी ३०५ व सपोर्ट स्टेशन ३ चे नांगर तुटले, तर जीएएल कन्स्ट्रक्टरच्या इंजिन रुममध्ये पाणी शिरल्यानं ते बंद पडले. नौदल व तटरक्षक दलाच्या जवानांनी तत्काळ मदतकार्य सुरु केले, अशी माहिती ओएनजीसीनं आपल्या वेबसाईटवर दिली आहे. पी ३०५ बार्जवरील खलाशांव्यतिरिक्त सपोर्ट स्टेशन ३ वरील २०१ कर्मचारी आणि जीएएल कन्स्ट्रक्टर वरील १३७ कर्मचारी सुखरूप आहेत. तर ओएनजीसीच्या तेल उत्खनन फलाट सागरभूषणवरील १०१ कर्मचारीही सुखरूप आहेत.

नौदलाच्या मदतीमुळेच बचावलो

जहाज बुडाल्यावर समुद्रात पडलेल्या अनेक कर्मचाऱ्यांनी धाडस दाखवून मदत येण्याची वाट पाहिली. नौसैनिकांनीही उधाण आलेल्या समुद्राची पर्वा न करता लाईफ बोटीतून दिसतील त्या कर्मचाऱ्यांना वाचवून युद्धनौकांवर नेले. त्यातील ज्या कर्मचाऱ्यांना तातडीने वैद्यकीय साह्याची गरज होती, त्यांना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने कालच मुंबईत आणण्यात आले. अन्य कर्मचाऱ्यांना आज युद्धनौकेतून मुंबईत आणले गेले. बचावलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना काय बोलावे ते सुचत नव्हते, त्यांच्या तोंडून शब्दच बाहेर फुटत नव्हता. नौदलाच्या मदतीमुळेच आम्ही बचावलो अन्यथा आमचे काही खरे नव्हते, असेही काही जणांनी बोलून दाखवलं.

धीर सोडला नाही

वादळामुळे समुद्रात दहा ते पंधरा फूट उंच लाटा उसळत होत्या, ताशी साठ ते सत्तर किलोमीटर वेगाने वारेही वहात होते. त्यातच समुद्रात पडलेल्या कर्मचाऱ्यांना थंडीमुळे हातपायही हलवता येत नव्हते. अंधारामुळे कोठे जावे, मदतीला कोण कोठून येत आहे हे देखील दिसत नव्हते. भीतीमुळे तहान-भुकेची तर जाणीवच संपली होती. धीर सुटला असता तर मृत्यूने केव्हाही गाठले असते पण आम्ही चिकाटी सोडली नाही. नौसैनिक ऐनवेळी देवासारखे धाऊन आले, असेही बचावलेल्या काही कर्मचाऱ्यांनी सांगितले. यांपैकी एक अमितकुमार कुशवाह हा कर्मचारी तर अकरा तास खवळलेल्या समुद्रात होता. तर मनोज गिते हा एकोणीस वर्षीय तरूणही सात ते आठ तास पाण्यात होता. मी या दुर्घटनेतून जगेन असे वाटत नव्हते, असेही तो म्हणाला.

सर्वात कठीण बचावकार्य

गेल्या तीस-चाळीस वर्षांतील हे सर्वात कठीण मदत व बचावकार्य होतं, असे नौदल उपप्रमुख मुरलीधर पवार यांनी सांगितलं.

अर्धा किमी दृष्यमानता

तर कालच्या वादळामुळे समुद्रावरील दृष्यमानता जेमतेम अर्धा ते एक किलोमीटर एवढीच होती, तरीही नौसैनिकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता बुडणाऱ्या कर्मचाऱ्यांना वाचवले, असे तटरक्षक दलाचे कमोडोर एम. के. झा म्हणाले.

शोधकार्य अजूनही सुरू

१८८ जणांना वादळातून वाचविल्यानंतरही उर्वरित कर्मचाऱ्यांचा शोध सुरु आहे, असे या मदतकार्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या INSKO युद्धनौकेचे मुख्याधिकारी कॅप्टन सचिन सिक्वेरा म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com