शौचालय दुरुस्तीसाठी 265 कोटींचा चुराडा! बेजबाबदार कारभाराचा फटका!

शौचालय दुरुस्तीसाठी 265 कोटींचा चुराडा! बेजबाबदार कारभाराचा फटका!

मुंबई : मुंबईतील शौचालयांच्या दुरुस्तीवर गेल्या पाच वर्षांत तब्बल 265 कोटी रुपये एवढी अवाढव्य रक्कम खर्च झाल्याची माहिती हाती आली आहे; मात्र मुंबईतील बहुतांश सार्वजनिक शौचालयांची स्थिती आजही दयनीय आहे. त्यामुळे शौचालयांच्या बांधकामाच्या दर्जावरच प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे. शौचालय दुरुस्ती आणि बांधकाम हे भ्रष्टाचाराचे कुरण असल्याचा आरोप यानिमित्ताने करण्यात येत आहे. 

निकृष्ट बांधकामामुळे नवे शौचालय बांधले की ते वर्षभरात दुरुस्तीला येते. बांधकामावर प्रशासनाचे नियंत्रण नसते. कंत्राटदाराच्या मर्जीनुसार शौचालयबांधणीची आणि दुरुस्तीची कामे होत असल्याचे आरोप यापूर्वीही झाले आहेत. शौचालयांच्या दुरुस्तीवर गेल्या पाच वर्षांत 265 कोटी खर्च होऊनही लोकसंख्येच्या प्रमाणात शौचालय बांधण्याचे उद्दिष्टही असफल ठरले आहे. 

शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये बांधली जाणारी शौचालये अत्यंत निकृष्ट दर्जाची आहेत. पालिका प्रशासनाचे शौचालयांच्या बांधकामावर कोणतेही नियंत्रण नसल्याने कंत्राटदारांना मोकळे रान मिळत आहे. 2014 मध्ये 24 विभाग कार्यालयांतर्गत शौचालये बांधण्याची कामे कंत्राटदारांना देण्यात आली. या शौचालयांमध्ये पाणी, विजेची सुविधा नाही. तसेच स्वच्छतेअभावी शौचालयांची दुरवस्था झाली आहे. दुरुस्तीसाठी मानखुर्द, चेंबूरमधील पाडण्यात आलेली शौचालये अद्यापही बांधण्यात आलेली नाहीत, त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. शौचालये कोसळून तसेच शौचालयांच्या टाक्‍यांचा स्फोट होऊन पूर्व आणि पश्‍चिम उपनगरात जीवित हानी झाल्याच्या घटना सतत घडत आहेत. आता विभाग स्तरावर कंत्रादारांना शौचालय दुरुस्तीची कामे देण्यात येत आहेत. त्यामुळे त्यावर प्रशासनाचे नियंत्रण नाही. कंत्राटदारांनी केलेल्या कामाचे ऑडिट होत नाही, त्यामुळे कंत्राटदारांना शौचालय दुरुस्ती आणि बांधणी हे भ्रष्टाचाराचे कुरण झाल्याचा आरोप होत आहे. वर्षभरात पालिकेचे 22 हजार 774 शौचकूप बांधण्याचे लक्ष्य आहे. त्यापैकी केवळ 5500 सीट्‌स बांधण्यात आले आहेत. 
--- 
एक भांडे बसवण्यासाठी दीड लाख रुपये 
शौचालयात एक भांडे बसवण्यासाठी दीड लाख रुपये खर्च येत असल्याची माहिती मलनिःसारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्या दराने कंत्राटदारांना शौचालय बांधणीची कामे दिली जात आहेत. 
---- 
चौकशीची मागणी बेदखल 
शौचालय बांधणी आणि दुरुस्तीच्या कामाची चौकशी करा, अशी मागणी तत्कालिन पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे या विभागातील अधिकाऱ्यांनीच केली होती; मात्र त्या मागणीची दखल प्रशासनाने घेतली नाही. 

शौचालय बांधणी आणि दुरुस्ती हे भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे ही वस्तुस्थिती आहे. विभाग स्तरावर ही कामे करण्यासाठी नेमलेले कंत्राटदार योग्य काम करत नाहीत. पालिकेचा पैसा वाया जात आहे. पाच वर्षांत अडीच हजार कोटींहून अधिक पैसा वाया गेला आहे. शौचालयांच्या दुरुस्तीवर खर्च केलेल्या पैशांतून नवी शौचालये उभारता आली असती. दुरुस्ती ही केवळ धूळफेक आहे, त्यामुळे सीडब्ल्यूसी पद्धत आणावी आणि प्रशासनाने याप्रकरणी चौकशी करावी. 
- रवी राजा, विरोधी पक्षनेते, मुंबई महानगरपालिका 
 

 265 crore stolen for toilet repair

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com