मुंबई पालिकेत 30 टक्के वैद्यकीय पदे रिक्त, आपत्तीकाळातील आरोग्य सेवेवर परिणाम

मुंबई पालिकेत 30 टक्के वैद्यकीय पदे रिक्त, आपत्तीकाळातील आरोग्य सेवेवर परिणाम

मुंबई: कोरोना विरोधात निकराची झुंज देणाऱ्या पालिकेच्या आरोग्य विभागात 30% पदे रिक्त आहेत. आरोग्य क्षेत्राच्या पायाभूत संरचना आणि मनुष्यबळ यांकडे खूप काळ दुर्लक्ष झाल्याचे दुष्परिणाम सध्याच्या कोविड-19च्या आपत्तीकाळातील आरोग्य सेवेवर पडत असल्याचे दिसते आहे. 2019 मध्ये महानगरपालिका रूग्णालयामध्ये वैद्यकीय कर्मचाऱ्यांची 60 % पदे रिक्त तर प्राथमिक आरोग्य सेवांमधील 30 %  पदे रिक्त आहेत. प्रजा फाऊंडेशनने "मुंबईताल आरोग्याची सद्यस्थिती"  या प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही माहिती दिली आहे. 

पालिकेकडे पुरेशा निधीची उपलब्धता असूनही पायाभूत संरचना दुर्लक्षित राहिलेली आहे. पालिकेच्या भांडवली खर्चाच्या बजेटचा वापर सातत्याने कमी राहिलेला असून 2018-19 मध्ये बजेटमध्ये तरतूद केलेल्या निधीपैकी 54% रक्कम वापरली नव्हती, तर हेच प्रमाण 2016-17 मध्ये 73% इतके होते, अशी माहिती प्रजा फाऊंडेशनचे संचालक मिलिंद म्हस्के यांनी दिली.

“कोविड खेरीज इतर आजारांच्या रूग्णांना आरोग्य सेवा देण्यावरही परिणाम झालेला आहे. विशेषत: जे सर्वस्वी सरकारी दवाखान्यांवर अवलंबून आहेत अशा रूग्णांची परिस्थिती बिकट झालेली आहे. कोविडकाळात कितीतरी रूग्ण कोविडखेरीज अन्य आजाराने मरण पावलेले असल्याचे या काळातील मृत्यूच्या आकडेवारीतून दिसते” असे म्हस्के म्हणाले.

या अहवालात आरोग्य समितीवर ही ताशेरे ओढण्यात आले आहेत. रूग्णालयांचे आणि आरोग्य केंद्रांचे नामकरण करण्याला महापालिकेच्या आरोग्य समितीने सर्वाधिक प्राधान्य दिल्याचे दिसते. 2019-20 मध्ये सर्वाधिक (17) प्रश्न नामकरणासंबंधी होते, तर मधुमेह वा टीबी बाबत एकही प्रश्न विचारण्यात आला नाही असे ही अहवालात म्हटले आहे. 

कोविड काळात कितीतरी रूग्ण कोविड खेरीज अन्य आजाराने मरण पावलेले असल्याचे या काळातील मृत्यूच्या आकडेवारीतून दिसते. मे 2020 मध्ये मुंबईमध्ये 13,833 मृत्यू झाले. तर मे 2019 मध्ये 6,832 मृत्यू झाले होते. मे 2020 मध्ये कोविडमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 957 आहे, त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 6,044 अधिक मृत्यू झाले असे दिसते असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

रिव्हाईजड नॅशनम टीबी कंट्रोल प्रोग्राम अंतर्गत नोंदवेलेल्या एकूण टीबी रूग्णांमधील औषध प्रतिरोधक टीबीच्या प्रकरणांमध्ये (MDR आणि XDR) 2014 ते 2018 या कालावधीत 63% इतकी मोठी वाढ झालेली आहे, तर याच कालावधीत एकूण रूग्ण नोंदणी 17% ने कमी झालेली आहे.

सन 2018 मध्ये मुंबईत दर दिवशी 28 लोकांचा मृत्यू कॅन्सरने, 29 लोकांचा मृत्यू मधुमेहाने आणि 22 जणांचा श्वसनाच्या आजाराने झाला आहे. असंसर्गजन्य रोगांचे प्रमाण इतके मोठे असूनही या आजारांना उद्देशून सर्वंकष धोरण अद्याप अस्तित्वात नसल्याचे ही अहवालात सांगण्यात आले आहे.

“या महामारीमुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरचा दबाव वाढला ही समस्या खरी आहे. परंतु अक्षम पायाभूत संरचना, अपुरे मनुष्यबळ आणि बजेटचा अप्रभावी वापर ही आरोग्य व्यवस्थेची स्थिती असल्याने नागरिकांना एरव्ही भेडसावणाऱ्या रोगांचा उपचार व्यवस्थाही सुरळीत चालण्यामध्ये अडचणी येत आहेत, असे मत प्रजा फाऊंडेशनचे विश्वस्त निताई मेहता यांनी मांडले.

------------

(संपादनः पूजा विचारे)

30 percent medical posts vacant mumbai municipality Report Praja Foundation

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com