मुंबई पालिकेच्या रुग्णालयांना पावसाचा फटका; नायर, कस्तुरबा, जे.जे. रुग्णालयात पाणीच पाणी, ओपीडीमध्ये रुग्णांचे हाल 

भाग्यश्री भुवड
Wednesday, 23 September 2020

मंगळवारी रात्रभर पडलेल्या मुसळधार आणि बुधवारी सकाळी पावसाचा जोर कायम राहिल्याने मुंबईतील नायर, कस्तुरबा आणि जेजे हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले.

मुंबई:  मंगळवारी रात्रभर पडलेल्या मुसळधार आणि बुधवारी सकाळी पावसाचा जोर कायम राहिल्याने मुंबईतील नायर, कस्तुरबा आणि जेजे हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले. नायर आणि कस्तुरबा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात पाणी साचल्याने रुग्णांचे हाल झाले तर जे. जे. रुग्णालयाच्या मुख्य इमारत आणि बाळाराम इमारतीच्या तळमजल्यावर पाणी तुंबले. यामुळे लिफ्ट बंद पडल्याने वाॅर्ड आणि चाचण्या करण्यासाठी जाणाऱ्या रुग्णांचे हाल झाले. मुंबईत मंगळवारी रात्रीपासून सुरु झालेल्या पावसाचा फटका रुग्णालयांनाही बसला. 

पावसामुळे हायकोर्टला सुट्टी; रिया, कंगना प्रकरणावर सुनावणी उद्या

जे. जे. रुग्णालयाच्या मुख्य इमारत आणि बाळाराम इमारतीच्या तळमजल्यावर मंगळवारी रात्रीच पाणी तुंबले. परंतु पंप लावून तातडीने या पाण्याचा निचरा करण्यात आला. मात्र हे पाणी इमारतींच्या लिफ्टमध्ये शिरल्याने लिफ्ट बंद पडल्या आहेत. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना पायऱ्या चढूनच वरखाली करावे लागले. चाचण्या करण्यासाठी ओपीडी इमारतीत जावे लागणाऱ्या रुग्णांचे प्रचंड हाल झाले. तसेच सोनोग्राफी विभागातही पाणी शिरल्याने तो विभाग काही काळ बंद ठेवावा लागला होता. 

त्याचप्रमाणे महापालिकेच्या नायर आणि कस्तुरबा रुग्णालयातही मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते. नायर हॉस्पिटलमध्ये ओपीडी आणि वॉर्डमध्ये पाणी तुंबले. वॉर्डमध्ये पाणी तुंबल्याने रुग्णांना अन्य वॉर्डमध्ये हलवण्यात आले. तर ओपीडीमध्ये पाणी तुंबल्याने अनेक रुग्णांना घरी पाठवण्यात आले. कस्तुरबा रुग्णालयाच्या परिसरातही पाणी तुंबल्याने रुग्णांचे प्रचंड हाल झाले. 

'कामगार कायद्यातील बदल म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार'; हे तर भांडवलदारांचे सरकार, सचिन अहिर यांची टीका

सध्या साथीच्या आजारांचे प्रमाण काहीसे वाढू लागल्याने महत्वाची रुग्णालये नॉन कोविड केली जात आहेत. त्यामुळे उपचारांसाठी सर्व रुग्णालयात रुग्णांची गर्दी होत आहे. लोकांसह ओपीडी मध्ये आलेल्या रुग्णांना ही पावसाचा फटका बसला. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना त्रास नको म्हणून पंप लावून पाणी काढण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला. शिवाय काही कर्मचाऱ्यांना ही पाणी उपसण्याच्या कामाला जुंपण्यात आले.

--------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Municipal Hospitals hit by rains