रायगडला आणखी 301 कोटींची मदत 

नुकसान2
नुकसान2

अलिबाग : निसर्ग चक्रीवादळात घरांचे नुकसान झालेल्या रायगडमधील नागरिकांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ दिलेली 100 कोटींची मदत कमी पडत असल्याने 301 कोटींची वाढीव मदत जाहीर केली. यातील 242 कोटी रुपये पडझड झालेल्या घरांच्या दुरुस्तीसाठी दिले जाणार आहेत. पावसाळा सुरू झाल्याने घरदुरुस्तीला प्राधान्य दिल्याची माहिती पालकमंत्री अदिती तटकरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत दिली.


निसर्ग चक्रीवादळामुळे झालेले नुकसान व प्रशासन करत असलेल्या कार्यवाहीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या बैठकीत पालकमंत्री म्हणाल्या की, निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणावर घर, झाडे, विजेच्या खांबांची पडझड झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 5 जून रोजी नुकसानग्रस्तांसाठी 100 कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर केली. ही मदत जिल्ह्यासाठी पुरेशी नसल्याने वाढीव मदत देण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली होती. त्यानुसार राज्य सरकारने आणखी 301 कोटींची मदत रायगड जिल्ह्यासाठी जाहीर केली आहे. यापैकी 242 कोटींची मदत ही घरांच्या नुकसान भरपाईसाठी आहे. 

आतापर्यंत झालेल्या पंचनाम्यानुसार घरांचे अंदाजे 395 कोटींचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. या नुकसानीसाठी 72 कोटी रुपयांचे अनुदान जिल्ह्याला प्राप्त झाले असून मदत वाटपाचे काम सुरू आहे. वाढीव मिळणाऱ्या मदतीतून मच्छीमार, फळबागायतदार, शाळा दुरुस्तीसाठी मदत दिली जाणार आहे. 

या वेळी खासदार सुनील तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, अपर जिल्हाधिकारी डॉ. भरत शितोळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रवींद्र मठपती, सर्जेराव मस्के पाटील (सा.प्र.), जिल्हा कृषी अधीक्षक पांडुरंग शेळके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे उपस्थित होते. 

मच्छीमारांनाही मिळणार भरपाई
अजूनही पंचनाम्याचे काम सुरुच आहे. ज्या मच्छीमारांच्या होड्यांचे नुकसान झाले आहे, त्यापैकी अंशत: नुकसानीसाठी 10 हजार रुपयांची मदत, तर ज्या होड्यांचे पूर्णत: नुकसान झाले आहे त्यांना 25 हजार रुपयांची मदत दिली जाणार असल्याचे तटकरे यांनी या वेळी स्पष्ट केले.
 


 


जिल्हा प्रशासनाकडे 301 कोटी रुपयांचा मदतनिधी प्राप्त होताच तो तत्काळ नुकसानग्रस्तांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल. जिल्हा प्रशासनाने पंचनामे करताना नुकसान झालेल्या प्रत्येक लहानसहान गोष्टींची नोंद काटेकोरपणे घ्यावी, जेणेकरून कोणताही नुकसानग्रस्त वंचित राहणार नाही. या वेळी नुकसान झालेल्या सरकारी शाळांबरोबरच खासगी व विनाअनुदानित शाळांनाही दुरुस्तीसाठी मदत केली जाणार आहे.
- अदिती तटकरे, पालकमंत्री, रायगड

300 crore fund raigad nisarga cyclone relef

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com