समुद्राकडून शहराला कचरा साभार परत! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

लाटांनी फेकला किनाऱ्यावर 300 टन कचरा 

मुंबई : समुद्राला आलेल्या भरतीमुळे शनिवारी (ता. 3) अवघ्या चार तासांत मुंबईतील किनाऱ्यावर सुमारे 300 मेट्रिक टन कचरा जमा झाला. प्रामुख्याने प्लास्टिक आणि थर्माकोलचा समावेश असलेला हा कचरा उचलण्याचे काम रात्रीपर्यंत सुरू होते.

शनिवारी दुपारी 1.44 वाजता समुद्रात 4.90 मीटरची भरती येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. जोरदार वाऱ्यामुळे समुद्र खवळलेला होता. त्यामुळे शहरातून समुद्रात टाकण्यात आलेला कचरा जोरदार लाटांनी पुन्हा किनाऱ्यावर आणून टाकला. मरिन ड्राईव्ह, गिरगाव, वरळी, दादर, जुहू, वर्सोवा आणि मढ या चौपाट्यांवर कचरा डेपोसारखी स्थिती निर्माण झाली होती. पाऊस आणि लाटांचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या मुंबईकरांना किनाऱ्यावरील कचरा तुडवत वाट काढावी लागली.

समुद्रात मोठी भरती असल्यामुळे किनाऱ्यावर येणारा कचरा उचलण्यासाठी महापालिकेने जादा कामगारांची नियुक्ती केली होती. उसळणाऱ्या लाटा समुद्रातील कचरा किनाऱ्यावर फेकत असल्यामुळे कठड्यांवर बसलेल्या पर्यटकांची तारांबळ उडाली. लाटांची उंची जास्त असल्यामुळे किनाऱ्याजवळ जाण्यास महापालिकेचे अधिकारी आणि जीवरक्षक मनाई करत होते. त्यामुळे नागरिकांचा हिरमोड होत होता. 

दरवर्षी पावसाळ्यात चौपाट्यांवर मोठ्या प्रमाणात कचरा जमा होतो. नागरिकांनी समुद्रात टाकलेला कचरा भरतीनंतर किनाऱ्यावर येतो. शहरातील कचरा, विशेषत: टाकाऊ प्लास्टिक गटारे, नाल्यांमधून समुद्रात येते. पावसाळ्यात समुद्राला भरती आली, की हा कचरा लाटांमार्फत किनाऱ्यावर परत येतो. 
- जय शृंगारपुरे, दादर चौपाटी स्वच्छता प्रमुख 

किनाऱ्यावर आलेला कचरा 
- मरीन लाईन्स : 15 मेट्रिक टन 
- गिरगाव चौपाटी : 5 मेट्रिक टन 
- दादर, माहीम : 50 मेट्रिक टन 
- वर्सोवा : 110 मेट्रिक टन 
- गोराई : 8 मेट्रिक टन 
- एकूण : 188 मेट्रिक टन 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 300 tons of waste dumped on the shore