खालापूर टोल नाक्‍यावर 35 लाखांचे गोमांस जप्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

रायगड पोलिसांच्या कारवाईत कंटेनरसह चालकास अटक

मुंबई : बंदी असतानाही खालापूर टोल नाक्‍यावर करण्यात आलेल्या कारवाईत सुमारे 28 टन गोमांस घेऊन जाणारा कंटेनर पकडण्यात आला. रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ही कारवाई करत कंटेनरचालकासह सुमारे 34 लाख 77 हजार 600 रुपये किमतीचे गोमांस ताब्यात घेतले.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग रायगडचे पोलिस निरीक्षक जमील शेख यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खालापूर टोल नाका येथे सापळा रचण्यात आला होता. मंगळवारी रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास आरोपी नीलेश शिवाजी जाधव (रा. काराजनगी, पो. निगडी खुर्द, ता. जत, जि. सांगली) हा त्याच्या ताब्यातील वातानुकूलित कंटेनर ट्रेलर (क्र. एम. एच. 15 एफ. व्ही. 7773) घेऊन मुंबईच्या दिशेने निघाला होता.

पोलिसांनी कंटेनर थांबवून तपासणी केली असता गोवंशीय प्राण्यांची कत्तल केलेले गोमांस बेकायदा विक्रीकरिता नेत असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी कंटेनरसह चालक नीलेश जाधव याला ताब्यात घेतले. 

पशुवैद्यकीय अधिकारी यांनी तपासणीत सदरचे गोवंशीय मांस असल्याचा निर्वाळा दिला. पोलिसांनी 28 टन कत्तलीचे सुमारे 34 लाख 77 हजार 600 रुपयांचे मांस आणि 30 लाख रुपये किमतीचा कंटेनर असा एकूण 64 लाख 77 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

याबाबत खालापूर पोलिस ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम 34 गोवंश हत्याबंदी अधिनियम, प्राणी संरक्षण अधिनियम 5, 5(क), 6, 9, 9(अ), 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक पी. पोरे तपास करीत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 35 lakh beef seized at Khalapur toll Naka