35 आदिवासी जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 फेब्रुवारी 2020

35 आदिवासी जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा रविवारी (ता. 23) रोजी आदिवासी सेवा मंडळाचे श्रीमती पार्वतीबाई जसुमल ठाकूर अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा माण विक्रमगड येथे मोठ्या थाटामाटात झाला. 

विक्रमगड : श्री राम ट्रस्ट शैक्षणिक व सामाजिक संस्था, मुलुंड- मुंबई व पालघर जिल्हा आदिवासी सेवा संस्था जव्हार व ग्रामीण आदिवासी शैक्षणिक व सामाजिक संस्था पळशीन यांच्या संयुक्त विद्यमाने 35 आदिवासी जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा रविवारी (ता. 23) रोजी आदिवासी सेवा मंडळाचे श्रीमती पार्वतीबाई जसुमल ठाकूर अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा माण विक्रमगड येथे मोठ्या थाटामाटात झाला. 

या वेळी सुरुवातीला आदिवासी संस्कृतीनुसार सांबाळ व तारपा वाद्य वाजवून भव्य मिरवणूक काढून जोडप्यांना विवाह मंडपात आणले. शाळेचे मुख्याध्यापक यशवंत वातास यांनी प्रास्ताविकामध्ये विवाह सोहळ्याच्या आयोजनासंदर्भात माहिती दिली व आदिवासी भागात आर्थिक अडचणीमुळे अनेक कुटुंबे विवाह करू शकत नाहीत, त्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे मत व्यक्त केले.

ही बातमी वाचा ः उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; विवाहित पुरूषासोबत लग्न केल्यास

त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचा आदिवासी तारपा व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर श्री राम ट्रस्टचे अध्यक्ष यांनी उपस्थित जोडप्यांना शुभेच्छा देऊन त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर ठीक 12.30 वाजता 35 जोडप्यांचा लग्न सोहळा आदिवासी सेवक रामकृष्ण दिग्रसकर व सरस्वती नडगे यांनी मंगलाष्टके म्हणून विवाह केला व वधूवरांच्या गळ्यात पुष्पहार घालण्यात आला. त्यानंतर सर्व जोडप्यांना मंगळसूत्र, संसारोपयोगी भांडी, कपडे तसेच चादर, सतरंजी अशा विविध वस्तू व मान्यवरांच्या हस्ते विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले. या वेळी सर्वांना जेवणाची सोय करण्यात आली होती. 

सामाजिक संस्थांचा पुढाकार 
या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी जय माताजी संस्था विरार, सरदार ट्रस्ट विरार व डॉ. ढवळे ट्रस्ट शैक्षणिक व सामाजिक संस्था भोपोली आणि लायन्स क्‍लब यांनी विशेष सहकार्य केले. तसेच सर्व संस्थांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित राहून मोलाचे सहकार्य केले. तसेच अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा माण येथील शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. या वेळी विक्रमगड जव्हार, मोखाडा, वाडा, तलासरी, डहाणू, वसई, विरार या परिसरातील वधू-वर व वऱ्हाडी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 35 Tribal Couples Community Marriage Ceremony