उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! विवाहित पुरुषासोबत लग्न केल्यास...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 फेब्रुवारी 2020

विवाहित पुरुषासोबत लग्न करणाऱ्या तरुणीवर कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच एका प्रकरणात म्हटले आहे

मुंबई ः विवाहित पुरुषासोबत लग्न करणाऱ्या तरुणीवर कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच एका प्रकरणात म्हटले आहे. कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा पती किंवा त्याच्या नातेवाईकांवर दाखल होतो आणि संबंधित तरुणी पतीची नातेवाईक नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले असून, पहिल्या पत्नीने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याचे निर्देशही दिले आहेत. 

हेही वाचा - उत्पन्न वाढवा बक्षिस मिळवा, एसटीची नवी योजना

नागपूर येथील एका रहिवाशाच्या पहिल्या पत्नीने त्याच्या दुसऱ्या पत्नीविरोधात पोलिस ठाण्यात फिर्याद केली आहे. भारतीय दंड विधानातील कलम क्र. 498 अ (कौटुंबिक िंहसाचार प्रतिबंधक कायदा) आणि कलम क्र. 494 (विवाहित पुरुषाबरोबर लग्न करणे) असे गुन्हे दुसऱ्या पत्नीवर लावण्यात आले आहेत. ही फिर्याद रद्द करण्यासाठी विनया साटले (नाव बदलले आहे) या 28 वर्षीय तरुणीने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठापुढे ऍड्‌. संग्राम सिरपूरकर यांच्यामार्फत फौजदारी याचिका केली होती. याचिकेवर नुकतीच न्या. सुनील शुक्रे आणि न्या. माधव जामदार यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. 

हेही वाचा सर्वोत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या एसटी आगरांना दोन लाखाचे बक्षिस

कलम क्र. 498 अ विवाहित महिलांसाठी असला, तरी पती आणि त्याच्या नातेवाईकांकडून होणाऱ्या छळासाठीच हा गुन्हा लागू होऊ शकतो. याचिकादार तरुणी पतीची नातेवाईक नाही; त्यामुळे तिच्याकडून त्याच्या पत्नीचा छळ झाल्याचे म्हणणे अयोग्य आहे, असा युक्तिवाद ऍड्‌. सिरपूरकर यांनी केला. या संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे दोन दाखलेही त्यांनी दाखल केले. खंडपीठाने हा युक्तिवाद ग्राह्य ठरवून याचिकादारावरील गुन्हा रद्द करण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर हा निकाल मर्यादित असला, तरी कलम क्र. 498 बाबत निर्माण झालेला कायदेशीर मुद्दाही न्यायालयाने सुनावणीसाठी खुला ठेवला आहे. 

कायद्यातील निकष गैरलागू 
भादंवि कलम क्र. 494 नुसार विवाहित पुरुष किंवा महिलेने दुसरे लग्न केले (पहिली पत्नी किंवा पती जिवंत असताना), तर संबंधित पती किंवा पत्नीवर गुन्हा दाखल होऊ शकतो; परंतु याचिकादार विनया साटले यांचा हा पहिलाच विवाह आहे; त्यामुळे या कलमाचे निकष त्यांना लागू होऊ शकत नाहीत, असे ऍड्‌. संग्राम सिरपूरकर यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Family Violence Act cannot be registered against a married woman