ऐरोलीतील ३६ मतदान केंद्रे संवेदनशील

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

ऐरोलीत विधानसभा क्षेत्रातील ३६ केंद्रावरील २१ ठिकाणे ही संवेदनशील असणार असून, त्या ठिकाणी पोलिसांसह निवडणूक आयोगाचे पथक करडी नजर ठेवणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आयोगाचे ऐरोली मतदारसंघात चार भरारी पथकासह एकूण तीन हजार कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

नवी मुंबई : नवी मुंबईतील ऐरोली विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोगाचे ऐरोली मतदारसंघात चार भरारी पथकासह एकूण तीन हजार कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. गुरुवारी (ता.१०) ऐरोलीत निवडणूक कार्यालयात मतदान यंत्रांच्या प्रथम सरमिसळीकरणाची प्रक्रिया (फर्स्ट रॅण्डमायझेशन) संगणकीय प्रणालीच्या साह्याने पार पडली. त्याचप्रमाणे निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी अभय करगुटकर यांनी याविषयीची माहिती दिली. या वेळी नायब तहसीलदार समता सुर्वे, ऐरोली विभागाचे समन्वयक गणेश आघाव यांच्यासह राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली २१ ऑक्‍टोबर रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. ऐरोलीतही निवडणूक अधिकारी यासाठी सज्ज झाले आहेत. त्यानुसार निवडणुकीचा कार्यक्रम आखण्यात आला आहे. यात मतदार जनजागृती, केंद्र ताब्यात घेणे, त्या ठिकाणी माहिती फलक उभारणे, मतपेट्या तपासणी आणि हाताळणी प्रात्यक्षिक, प्रत्यक्षात केंद्रावर करावयाची कामे अशी माहिती कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे.

ऐरोली विधानसभा क्षेत्रातून एकूण ४ लाखांहून अधिक मतदारांची नोंद झाली आहे. मतदान प्रक्रिया शांत व निर्भयपणे पार पडण्यासाठी जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे. ऐरोली विधानसभा क्षेत्रात ८२ ठिकाणी ४४० मतदान केंद्रे असणार आहेत. निवडणूक काळात ४ भरारी पथके, ४ व्हिडीओ चित्रित कर्मचारी आणि इतर केंद्रनिहाय ३ हजार कर्मचारी तैनात करण्यात आल्याची माहिती करगुटकर यांनी दिली. ऐरोलीत विधानसभा क्षेत्रातील ३६ केंद्रावरील २१ ठिकाणे ही संवेदनशील असणार असून, त्या ठिकाणी पोलिसांसह निवडणूक आयोगाचे पथक करडी नजर ठेवणार आहेत. अपंगांसाठी वाहनव्यवस्था, ज्येष्ठांसाठी वाहन व्यवस्थादेखील तैनात असणार आहे.

तक्रारीसाठी हेल्पलाईन
ऐरोलीत शांततामय वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडावी याकरिता नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करीत निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी १९५० ही विशेष हेल्पलाईन सुविधा आणि ॲप सुरू करण्यात आल्याचे करगुटकर यांनी सांगितले.

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याला दिलेले काम करणे अनिवार्य आहे. निवडणुकीचे काम नाकारल्याबद्दल आतापर्यंत कर्मचाऱ्यांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. निवडणुकीचे काम नाकारून कामाचा खोळंबा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. 
-अभय करगुटकर, निवडणूक निर्णय अधिकारी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 36 polling stations in airoli are sensitive