बॅंकाना लावला चार कोटींना चुना; वाचा काय आहे प्रकरण

बॅंकाना लावला चार कोटींना चुना; वाचा काय आहे प्रकरण

नवी मुंबई : विविध बॅंकांच्या एटीएम मशीनमध्ये पैसे भरणा करणाऱ्या सिक्‍युरिट्रान्स इंडिया प्रा. लि. या कंपनीत सिनियर कस्टोडियन म्हणून कामाला असलेल्या सचिन शिवाजी वाघ याने एटीएम की व पासवर्डचा वापर करून सुमारे चार कोटी रुपयांचा अपहार करून पलायन केल्याचे उघडकीस आले आहे. यात बॅंकेतील काही कर्मचाऱ्यांचादेखील समावेश असल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी कोपरखैरणे पोलिसांनी सचिन वाघ व त्याच्यासह या गुह्यात सहभागी असलेल्या सर्वांवर गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

सिक्‍युरिट्रान्स इंडिया प्रा. लि. या कंपनीच्या वतीने मुंबईतील एक्‍सिस, एचडीएफसी, डीसीबीसी बॅंक, आरबीएल बॅंक, इंडसइंड बॅंक, बॅंक ऑफ महाराष्ट्र, ओरिएंटल बॅंक ऑफ कॉमर्स, आयसीआयसीआय बॅंक, रत्नाकर बॅंक अशा विविध बॅंकांच्या एटीएममध्ये पैसे भरणा करण्याचे काम केले जाते. प्रत्येक रूटच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी १ ड्रायव्हर, २ कस्टोडियन आणि १ सिक्‍युरिटी गार्ड (गन मॅन) अशी चार जणांची टीम असते. याच कंपनीच्या कोपरखैरणे शाखेत आरोपी सचिन वाघ हा सिनियर कस्टोडियन म्हणून काम करत होता.

सिनियर कस्टोडियन हा त्या टीमचा लीडर असल्याने त्याच्याकडे एटीएम की आणि ॲडमिन कार्ड असते.त्याचा वापर करून एटीएममध्ये पैसे भरण्याचे काम सिनियर कस्टोडियनकडून केले जाते. वाघ याने गेल्या ११ ते २५ डिसेंबर या कालावधीत आपल्या टीममधील इतरांसह कोपरखैरणे रूट क्र. २ मधील सर्व एटीएममध्ये जाऊन एटीएम मशीन की व ॲडमिन कार्डचा वापर करून त्यात पैसे भरण्याचा बहाणा करत अपहार केला. यात वाघ याने ३५ एटीएममधील तब्बल तीन कोटी ९६ लाख ८२ हजार रुपयांचा अपहार केला. त्यानंतर त्याने संबंधित बॅंकेकडे त्यांच्या एटीएममध्ये सांगितल्यानुसार रक्कम भरण्यात आल्याबाबतचा अहवालदेखील पाठवून दिला. त्यामुळे बॅंकांना हा प्रकार लक्षात आला नाही.

ही बातमी वाचा ः खातेवाटप न झाल्याने वाढतेय मंत्रालयातील फाईल्सची संख्या...
ग्राहकांच्या तक्रारीनंतर प्रकरण उघडकीस
ग्राहकांकडून एटीएम मशीनमध्ये पैसे नसल्याच्या तक्रारी विविध बॅंकांकडे येऊ लागल्यानंतर सिक्‍युरिट्रान्स कंपनीच्या रिजनल ऑफिसकडून ३७ पैकी ३५ एटीएमचे ऑडिट करण्यात आले. सदर एटीएममध्ये तीन कोटी ९६ लाख ८२ हजार रुपये कमी असल्याचे आढळून आले; तर उर्वरित दोन एटीएमचे ऑडिट करता आलेले नाही. त्यामुळे त्या एटीएममधील रकमेचा आकडा समजू शकलेला नाही. त्यामुळे सिक्‍युरिट्रान्स कंपनीने सचिन वाघ याच्या घरी जाऊन त्याचा शोध घेतला असता तो घरातून निघून गेल्याचे आढळून आले. यावरून सचिननेच आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने एटीएममधील रकमेचा अपहार केल्याचे आढळून आल्यानंतर सिक्‍युरिट्रान्स कंपनीने त्याच्याविरोधात कोपरखैरणे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com