मेट्रो-3च्या मार्गातील चारशे झाडे तोडणार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 नोव्हेंबर 2016

या झाडांवर पडणार कुऱ्हाड 

- काळबादेवी, गिरगाव - 38 झाडे तोडणार, 33 झाडांचे पुनर्रोपण 
- सरकारी वसाहत, वांद्रे - 120 झाडे 
- हॉटेल सहारा स्टार, विलेपार्ले - 100 झाडे 
- एमआयडीसी रोड, मरोळ- 110 झाडे तोडणार, 130 झाडांचे पुनर्रोपण 
- सीप्झ बस आगार - 17 तोडणार - 115 पुनर्रोपण 
- एमआयडीसी - 22 तोडणार, 130 पुनर्रोपण

मुंबई : मेट्रो रेल्वेच्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ या तिसऱ्या टप्प्यासाठी तब्बल 400 हून अधिक झाडे तोडण्याची परवानगी शुक्रवारी महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत देण्यात आली. मेट्रोच्या मार्गातील झाडांचा अडथळा दूर करण्यासाठी प्राधिकरणाची ही विशेष बैठक झाली. या मार्गातील सुमारे 400 झाडांचे पुनर्रोपण होणार आहे. 

मेट्रो रेल्वेच्या काळबादेवी आणि गिरगाव स्थानकासाठी 38 झाडे कापण्याचा प्रस्ताव गेल्या आठवड्यात वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मांडण्यात आला होता. आयत्या वेळी प्रस्ताव मांडण्यात आल्याने तो मंजूर करण्यास शिवसेनेसह सर्व विरोधी पक्षांच्या सदस्यांनी नकार दिला होता. त्यामुळे या प्रस्तावासाठी शुक्रवारी विशेष बैठक घेण्यात आली. या 38 झाडांबरोबरच मेट्रोच्या मार्गातील इतर झाडे तोडण्याचे प्रस्ताव या वेळी मांडण्यात आले. अंधेरी पूर्व, वांद्रे, सहारा स्टार हॉटेल, विलेपार्ले, सीप्झ बस आगार, आंतरराष्ट्रीय विमानतळ, एमआयडीसी या परिसरातील 386 झाडे तोडण्याचा प्रस्ताव प्राधिकरणाच्या पटलावर मांडण्यात आला होता. या बैठकीत ही 424 झाडे तोडण्यास आणि सुमारे 400 झाडांचे पुनर्रोपण करण्याच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. 

विकासाच्या नावाखाली झाडांवर कुऱ्हाड 
विकासाच्या नावाखाली झाडांची कत्तल सुरू आहे, असा आरोप मनसेचे नगरसेवक दिलीप लांडे यांनी केला. आवश्‍यकता नसेल तिथे झाडे तोडू नयेत. तोडलेली झाडे त्याच परिसरात लावावीत, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी केली. तोडलेल्या झाडांच्या मोबदल्यात जिथे झाडे लावली जातील, त्या परिसराची पाहणी करण्याची मागणी करण्यात आली आहे, असे पालिका सभागृह नेत्या तृष्णा विश्‍वासराव यांनी सांगितले. 

प्रशासनावर कुणाचा दबाव? 
मेट्रोच्या प्रस्तावासाठी प्रशासन युद्धपातळीवर कामे करते. यामागे प्रशासनावर कुणाचा दबाव आहे, असा प्रश्‍न उपस्थित करत अशाच प्रकारे इतर प्रस्तावांबाबत प्रशासनाने तत्काळ निर्णय घेतल्यास मुंबईच्या विकासाला गती मिळू शकेल, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सदस्य अभिजित चव्हाण यांनी लगावला. 

Web Title: 400 trees will be removed for Metro 3 in Mumbai