सुवर्ण कामगिरी...रोबोटिक्‍स स्पर्धेत पीएनपीला पाच सुवर्णपदक

सुवर्ण कामगिरी...रोबोटिक्‍स स्पर्धेत पीएनपीला पाच सुवर्णपदक

अलिबाग (बातमीदार) : विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान आणि त्या संबंधित अभ्यासक्रमाची आवड निर्माण व्हावी, यासाठी अलिबागमध्ये ‘रोबोटिक्‍स चॅम्पियनशिप’ या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली होती. या कार्यशाळेतून तंत्रज्ञानाविषयी स्पर्धेचे आयोजन मुंबई येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत पीएनपी शाळेतील विद्यार्थ्यांनी सुवर्ण कामगिरी केली.

आयआयटी मुंबई, एनआरसी इंडिया आणि पीएनपी एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने वेश्वी येथील शैक्षणिक संकुलात ९ व १० नोव्हेंबर रोजी ‘रोबोटिक्‍स चॅम्पियनशिप’ या विषयावर दोनदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षण आयआयटी मुंबई, एनआरसी इंडिया यांच्यामार्फत रोबोटचे डिझाईन, सर्किट डायग्राम, मोटर ड्रायव्हर सर्किट व सर्किट डिझाईन, कार्बन कलर कोड व ट्रान्जिस्टरचे रोबोटमध्ये असलेले महत्त्व; तसेच ड्रोनचे सर्किट डायग्राम आणि रोबोट कंट्रोल कसा करायचा? या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले होते.

या कार्यशाळेतून प्राथमिक, माध्यमिक, होली चाईल्ड स्कूल वेश्वी आणि सायरस पुनावला नागाव शाळेचे १५ विद्यार्थ्यांची स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. ही स्पर्धा ११ व १२ जानेवारीला भारतीय विद्या भवनचे सरदार पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय अंधेरी पश्‍चिम येथे पार पडली. ११ जानेवारीला निवड चाचणी घेण्यात आली. या १५ विद्यार्थ्यांपैकी पाच विद्यार्थ्यांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. ही फेरी १२ जानेवारीला पार पडली. या फेरीमध्ये विद्यार्थ्यांसाठी रिमोट कंट्रोल रोबोकार्ट चालवून दाखवण्याची स्पर्धा झाली. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून आलेल्या सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि फायनल राऊंडमध्ये गेलेल्या पीएनपीच्या राज भोनकर, हर्ष पाटील, सर्वार्थ घरत, मुक्ता म्हात्रे आणि वेदश्री गावंड यांना प्रमाणपत्र व सुवर्ण पदक देऊन गौरवण्यात आले. 

विद्यार्थ्यांनी सुवर्ण कामगिरी केल्याबद्दल पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, उद्योजक भगवान मालपणी, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक नीलेश मगर, मुख्याध्यापिका रिना म्हात्रे, गितिका भूचर, रसना व्यास यांनी अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com