खैरपाडा गावात 10 दिवसांत 5 जणांचा मृत्यू! आरोग्य यंत्रणेत संभ्रम, ग्रामस्थ भीतीच्या छायेत

संतोष पेरणे
Friday, 20 November 2020

कर्जत तालुक्‍यातील वारे ग्रामपंचायतीमधील खैरपाडा गावात 10 दिवसांत पाच जणांना मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणे नव्हती. त्यामुळे आरोग्य यंत्रणा संभ्रमात आहे.

नेरळ: कर्जत तालुक्‍यातील वारे ग्रामपंचायतीमधील खैरपाडा गावात 10 दिवसांत पाच जणांना मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणे नव्हती. त्यामुळे आरोग्य यंत्रणा संभ्रमात आहे. दक्षता म्हणून आरोग्य विभागाने गावात आरोग्य तपासणी सुरू केली आहे, तर आकस्मिक मृत्यूच्या घटना वारंवार घडत असल्याने परिसरात घबराट आहे. 

हेही वाचा - आदित्य ठाकरे- अतुल भातखळकर लढतीत, मनसे गेमचेंजर ठरण्याची शक्यता?

कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्गावरील खैरपाडा हे गाव अवघ्या 40 घरांचे आहे. गावात 9 नोव्हेंबरला एका 42 वर्षीय व्यक्तीचा अल्पशा आजाराने मृत्यू झाला. त्यानंतर आतपर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यामधील तीन रुग्णांवर एमजीएम रुग्णालय कळंबोली, साई हॉस्पिटल नेरळ आणि उल्हासनगर येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत होते; दोन व्यक्तींचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्‍याने झाला आहे. मात्र सर्व मृतांना रक्ताच्या उलट्या झाल्या आहेत. या व्यक्तींना कोरोनाची लक्षणे नव्हती, असे सांगण्यात येते. तसेच पाच व्यक्तींचे सरासरी वय 42-45 वर्षे होते. त्यामुळे आरोग्य यंत्रणा चक्रावली आहे. वारे परिसरात यामुळे भीतीचे वातावरण आहे. 

हेही वाचा - मुंबईतील शाळा बंद, मात्र सोमवारपासून ठाण्यातल्या शाळांची वाजणार पहिली घंटा

खैरपाड्यातील मृत्यूच्या घटनांमुळे कळंब प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलेश यादव यांनी ग्रामस्थांची आरोग्य तपासणी केली. मृत व्यक्तींना कावीळ झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे गावातील कूपनलिकांच्या पाण्याची तपासणी करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. 

रक्ताची उलटी आणि त्यानंतर झालेले मृत्यू हे कोरोनामुळे झाले नाहीत हे सिद्ध झाले आहे. मात्र मृत्यू का होतात, याचा अभ्यास आम्ही सुरू केला असून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे शवविच्छेदन अहवाल लक्षात घेता कावीळची शक्‍यता अधिक आहे. त्यामुळे दूषित पाण्याने कावीळ होऊ शकते हे लक्षात घेऊन आम्ही गावातील सर्व 28 बोअरवेलमधील पाणी तपासणीसाठी पाठवले आहे. 

डॉ. नीलेश यादव-
वैद्यकीय अधिकारी, कळंब प्राथमिक आरोग्य केंद्र 

 

 

आम्ही वारे ग्रामपंचायतीमधील घटनेकडे तात्काळ लक्ष केंद्रित केले असून गावातील खासगी बोअरवेल यातून तर दूषित पाणी येत नाही ना, याचा अभ्यास करण्यासाठी आणि तात्काळ उपाययोजना करण्यासाठी आम्ही पाण्याचे नमुने घेतले आहेत. त्यांचे अहवाल आल्यावर तात्काळ तालुक्‍यातील आरोग्य यंत्रणा वारे ग्रामपंचायतीमधील मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी प्रयत्न करील. 
बाळाजी पुरी-
गटविकास अधिकारी, कर्जत पंचायत समिती 

5 killed in 10 days in Khairpada village Confusion in the health system The villagers in the shadow of fear 

--------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 5 killed in 10 days in Khairpada village Confusion in the health system The villagers in the shadow of fear