लेखणी बंदचा मुद्रांक विभागाला 50 कोटींचा फटका

stamp-duty
stamp-duty

खालापूर : कोरोना महामारीतही सरकारकडून होत असलेले दुर्लक्ष आणि तीन वर्षांपासून प्रलंबित मागण्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेकडून मंगळवारी लेखणी बंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे सरकारचा अंदाजे 50 कोटींचा महसूल बुडाला. मागण्या मान्य न झाल्यास 4 ऑगस्टपासून बेमुदत लेखणी बंदचा इशारा संघटनेने दिला आहे.


कोरोना महामारीतही मुद्रांक विभागातील सर्व कर्मचारी कामावर हजर आहेत. यासाठी सरकारकडे जीवन सुरक्षा बीमा कवचची मागणी करूनही ती लागू करण्यात आली नाही. राज्यात आतापर्यंत यामुळे तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यूही झाला आहे. याशिवाय तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध 11 मागण्यांसाठी एकदिवसीय लेखणी बंद आंदोलन पुकारण्यात आले. यावेळी 3 ऑगस्टपर्यंत या मागण्यांवर निर्णय न झाल्यास 4 ऑगस्टपासून बेमुदत लेखणी बंद आंदोलन पुकारण्यात येणार आहे.

या आहेत मागण्या
नोंदणी विभागातील सर्व संवर्गातील रखडलेल्या पदोन्नत्या तत्काळ करणे, मुंबईतील मुद्रांक जिल्हाधिकारी पदावर अधिकारी नेमणे, शिपाई पदे तत्काळ भरणे, 50 टक्के दुय्यम निबंधक पद रिक्त असून, त्याचा कार्यभार लिपिकांकडे दिल्याने कामकाज करताना त्यांच्याकडून चुका झाल्या आहेत त्यामुळे त्यांच्यावर केलेली कारवाई मागे घेणे, दुय्यम निबंधक कार्यालयासाठी नवीन इमारती खरेदी करणे, कार्यालयात चांगल्या प्रतीचे हार्डवेअर साहित्य पुरवणे, आयकर, पोलिस व इतर विभाग मागवत असलेल्या माहितीसाठी स्वतंत्र यंत्रणा राबवणे, आय सरिता प्रणाली, ग्रास व आधार सर्व्हर याबाबत सुसूत्रता आणणे; तसेच तुकडाबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवून दुय्यम निबंधक यांच्यावर केलेली कारवाई रद्द करण्यासह रेरा कायदा सुस्पष्टता आणि दुय्यम निबंधक वर्ग 2 व 1 संवर्गाचे एकत्रिकरण या प्रमुख  मागण्या आहेत.

दस्त नोंदणी मंगळवारी 100 टक्के बंद राहिल्याने सरकारचा अंदाजे 50 कोटींचा महसूल जमा होऊ शकला नाही. 3ऑगस्टपर्यंत मागण्यांचा विचार व ठोस निर्णय न झाल्यास 4 ऑगस्टपासून बेमुदत लेखणी बंद आंदोलन करण्यात येईल.
- सागर पवार, सचिव, नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटना

50 crore loss to stamp department

( संपादन ः रोशन मोरे)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com