500 फुटांच्या घरांना करमाफी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

उद्धव ठाकरे यांची घोषणा; भाजपवर कुरघोडी 

उद्धव ठाकरे यांची घोषणा; भाजपवर कुरघोडी 

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती होण्यासाठी दोन्ही पक्षांकडून खलबते सुरू असतानाच जाहीरनाम्याचा भाग म्हणून शिवसेनेने गुरुवारी (ता. 19) भाजपवर कुरघोडीचा प्रयत्न केला. 500 चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांवर पाच वर्षे मालमत्ता कर न आकारण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरसकट मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा केली. यामुळे भाजपला सारवासारव करावी लागली. हा निर्णय आमचाच असल्याचे भाजपला जाहीर करावे लागले. 
मुंबई महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू झाली असतानाच शिवसेना-भाजप युती होण्याबाबत नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. गुरुवारी उद्धव यांनी पत्रकार परिषदेत काही आश्‍वासने जाहीर केली. मुंबईतील 500 चौरस फुटांच्या घरांना सरसकट करमाफी, तर 700 चौरस फुटांपर्यंत घरांकरता रहिवाशांना मालमत्ता करात सवलत देण्याचे आश्‍वासन ठाकरे यांनी दिले. 
वास्तविक, याबाबत राज्य सरकारने 27 मे 2015 ला मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला होता. मुंबई महापालिका क्षेत्रातील 500 चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांच्या मालमत्ता करात पुढील पाच वर्षे वाढ न करण्याचा हा निर्णय होता. मुंबईत अशा घरांची संख्या 16 लाख 79 हजार 265 इतकी आहे. ही घरे प्रामुख्याने जुन्या इमारतीत आहेत. सध्या या इमातींच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू असल्याने सरकारच्या निर्णयाचा रहिवाशांना फायदा होणार होता. दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या या निर्णयाची भाजपला आठवण होण्याआधीच उद्धव यांनी कुरघोडीचा प्रयत्न केल्याने भाजपचे धाबे दणाणले. अशा रहिवाशांना मालमत्ता करात सूट देण्यापेक्षा सरसकट कर माफ करण्याची घोषणा ठाकरे यांनी केली. 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना कर सवलत जाहीर करून मुंबईतील मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न शिवसेनेने केले आहेत. 

कलगीतुरा रंगणार! 
याबाबत मुंबई भाजपचे अध्यक्ष ऍड. आशीष शेलार यांनी करमाफी देण्याची मागणी आपणच विधिमंडळात केली होती, असे सांगितले. तसेच, भाजपच्या जाहीरनाम्यात हा मुद्दा असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शिवसेना-भाजपची युती आणि जाहीरनामे प्रसिद्ध होण्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी घरांच्या मालमत्ता कराचा मुद्दा "हायजॅक' केल्याने युतीत कलगीतुरा रंगण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

 

 
 

Web Title: 500Sqft home taxfree