पोटातून निघाल्या कोकेनने भरलेल्या 60 कॅप्सूल 

अनिश पाटील
रविवार, 4 ऑगस्ट 2019

अमली पदार्थ तस्कर असल्याच्या संशयावरून हवाई गुप्तचर विभागाने (एआययू) विमानतळावर पकडलेल्या व्हेनेझुएलाच्या नागरिकाने कोकेनच्या 60 कॅप्सूल गिळल्याचे एक्‍सरे तपासणीतून उघड झाले होते.

मुंबई : अमली पदार्थ तस्कर असल्याच्या संशयावरून हवाई गुप्तचर विभागाने (एआययू) विमानतळावर पकडलेल्या व्हेनेझुएलाच्या नागरिकाने कोकेनच्या 60 कॅप्सूल गिळल्याचे एक्‍सरे तपासणीतून उघड झाले होते. त्यानंतर जे. जे. रुग्णालयात सहा दिवसांत त्याच्या पोटातून 60 कॅप्सूल बाहेर काढण्यात डॉक्‍टरांना यश आले. या प्रकरणात ब्राझीलमधील नायजेरियन तस्कराचा हात असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर व्हेनेझुएलन नागरिकाला अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याखाली अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

डेमनाईस मिगुईल टोवर सेल्स (27) या दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलन तस्कराच्या पोटातून कोकेनच्या 60 कॅप्सूल ताब्यात घेण्यात आल्या. त्याला एआययूच्या पथकाने 19 जुलैला मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले होते. त्याच्याकडील सर्व बॅगा व इतर साहित्याच्या तपासणीत काहीच सापडले नव्हते; मात्र एक्‍सरे तपासणीत त्याच्या पोटात कॅप्सूल असल्याचे आढळले. त्यानंतर त्याला जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले; तेथील डॉक्‍टरांनी एनिमा देऊन या तस्कराच्या पोटातून सर्व कॅप्सूल बाहेर काढल्या. त्यासाठी डॉक्‍टरांना सहा दिवस प्रयत्न करावे लागले.

जे. जे. रुग्णालयातील डॉक्‍टरांनी पहिल्यांदा 21 जुलैला सेल्सच्या पोटातून 14 कॅप्सूल बाहेर काढल्या. त्यानंतर सहा दिवसांत थोड्या-थोड्या करून 60 कॅप्सूल काढण्यात आल्या. या कॅप्सूलमध्ये पांढऱ्या रंगाची भुकटी होती. त्याच्या पोटातील कॅप्सूलमधून मिळालेल्या सुमारे 650 ग्रॅम कोकेनची किंमत दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

या व्हेनेझुएलन नागरिकाने इंग्रजी भाषा येत नसल्याचा दावा केल्यामुळे चौकशीसाठी दुभाषाची मदत घेण्यात येत आहे. हे कोकेन तो मुंबईत कोणाला देणार होता याबाबत तपास सुरू आहे. चौकशीत या तस्करीचे धागेदोरे ब्राझीलपर्यंत पोहोचले आहेत. तेथील पॅट्रिक या नायजेरियन तस्कराने हे अमली पदार्थ दिल्याचे त्याने सांगितले.

या तस्करीसाठी त्याला 3000 अमेरिकन डॉलर मिळणार होते; मात्र त्यापूर्वीच तो पकडला गेला. डॉक्‍टरांनी प्रकृती ठीक असल्याचे सांगितल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. मुंबई विमानतळावरून 10 दिवसांपूर्वी एका परदेशी महिलेलाही कोकेन तस्करीप्रकरणी केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली होती. तिच्या पोटात 24 कोटी रुपयांच्या कोकेनच्या कॅप्सूल सापडल्या होत्या. 

सुरिनामी नागरिकाकडून सहा कोटींचे कोकेन जप्त 
केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने केलेल्या आणखी एका कारवाईत शुक्रवारी रात्री मुंबई विमानतळ परिसरातून डेसमंड एडवर्ड प्रिन्स (31) या परदेशी नागरिकाला अटक करण्यात आली. दक्षिण अमेरिकेतील सुरिनामची राजधानी पारामोरिबो येथील रहिवासी असलेल्या प्रिन्सकडून सहा कोटी रुपयांहून अधिक किमतीचे दोन किलो कोकेन जप्त करण्यात आले. त्याला अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याखाली अटक करण्यात आली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 60 capsules filled with cocaine coming out of the stomach