मुंबईतील रेल्वे प्रकल्पांसाठी 636 कोटी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

मुंबई - मुंबई महानगर क्षेत्रातील भविष्यातील उपनगरी रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 636.80 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मध्य व पश्‍चिम रेल्वेच्या यंत्रणेतील पायाभूत सुधारणांपासून ते फलाटांची उंची वाढवण्यासाठी भरीव तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

मुंबई - मुंबई महानगर क्षेत्रातील भविष्यातील उपनगरी रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 636.80 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मध्य व पश्‍चिम रेल्वेच्या यंत्रणेतील पायाभूत सुधारणांपासून ते फलाटांची उंची वाढवण्यासाठी भरीव तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर देशातील सर्वाधिक व्यस्त असणाऱ्या मुंबई उपनगरी लोकल सेवेला काय मिळाले, त्याची उत्सुकता शुक्रवारी (ता. 3) संपली. अर्थसंकल्पातील सविस्तर आकडे जाहीर झाले असून, एमयूटीपी टप्पे-2 व 3 वेग घेणार आहे. अर्थसंकल्पात महानगरातील वाहतूक क्षेत्रातील नियोजनासाठी 636 कोटी 80 लाख मंजूर झाले आहेत. त्यातील मुंबई नागरी वाहतूक प्रकल्पासाठी 548 कोटी 49 लाख मंजूर झाले आहेत. एमयूटीपी-2 अर्थात दिवा-ठाणे पाचवा-सहावा मार्ग, सीएसटी-कुर्ला पाचवा- सहावा मार्ग व अंधेरी-गोरेगाव हार्बर मार्गाच्या विस्ताराची कामे अपूर्ण आहेत. या कामासाठी 137 कोटी केंद्राने मंजूर केले आहेत. या प्रकल्पात राज्य सरकारला तेवढीच रक्कम उभी करावी लागणार आहे. तब्बल 274 कोटींच्या रकमेतून ही रखडलेली कामे पूर्ण होणार आहेत.

मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प टप्पा-3 योजनेसाठी केंद्राने 411.49 कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या प्रत्येक प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियांना आता वेग येणार आहे. या योजनेत वसई-विरार चौपदरीकरण, पनवेल-कर्जत उपनगरी दुहेरी मार्गिका, कळवा-ऐरोली उन्नत जोडमार्ग या मोठ्या प्रकल्पांबरोबरच नवीन लोकल व रेल्वे रूळ ओलांडण्यास प्रतिबंध यांचाही समावेश आहे. यापैकी कळवा-ऐरोली मार्गाच्या बांधकामासाठी पहिल्यांदा निविदा प्रक्रिया सुरू होण्याची शक्‍यता आहे. शिवाय मार्गाची लांबी कमी असल्याने काम लवकर संपेल, असे एमआरव्हीसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
विरार-वसई-पनवेल या 8787 कोटींच्या प्रकल्पासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात दहा लाखांची तरतूद केली आहे; पण अर्थसंकल्पात प्रकल्पाला प्राथमिक रक्कम नोंदवली गेली, हे महत्त्वपूर्ण असल्याचे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले. प्रवासी सुविधांसाठी 83 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

उन्नत रेल्वे मार्गाला चालना

 

सीएसटी-पनवेल आणि वांद्रे-विरार या दोन्ही उन्नत रेल्वे मार्गांसाठी प्रत्येकी दहा लाखांची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी वांद्रे-विरार हा रेल्वे मार्ग सार्वजनिक-खासगी भागीदारीत बांधण्याचा विचार आहे. प्राथमिक रक्कम अल्प असली तरी ऑगस्ट महिन्यातील फेरआढाव्यात त्यात वाढ होऊ शकते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

महानगर क्षेत्रातील इतर प्रकल्प
मार्ग तरतूद
- कल्याण-कसारा 70 कोटी
- कळंबोली 25 कोटी

(नवीन कोचिंग टर्मिनस)
- बेलापूर-पनवेल - 11 कोटी

(पूर्व-पश्‍चिम मार्ग)
- ठाणे-तुर्भे-नेरूळ-वाशी 5 कोटी 50 लाख
- बेलापूर-सीवूडस्‌- उरण - 66 कोटी

फलाटांची उंची वाढणार
लोकल व फलाटातील अंतर कमी करण्यासाठी फलाटांची उंची वाढवण्याच्या कामाला वेग येणार आहे. चर्चगेट ते विरारदरम्यानच्या 97 फलाटांची उंची वाढवण्यात येणार आहे. त्याच पद्धतीने मध्य रेल्वेच्या सुमारे 30 फलाटांची उंची वाढवण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे.

माथेरानच्या राणीला निधी
नेरळ ते माथेरानदरम्याच्या नॅरोगेज मार्गाची दखल अर्थसंकल्पात घेण्यात आली आहे. संरक्षक भिंतीच्या कामासाठीही निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे बंद पडलेली माथेरानची राणी पुन्हा एकदा धावण्यास सज्ज होणार आहे.

Web Title: 636 crore for railway projects in Mumbai