अंथरुणाला खिळलेली वृद्धा चालू लागली

नेत्वा धुरी 
गुरुवार, 11 एप्रिल 2019

भायखळ्यातील जे. जे. रुग्णालयात दोन शस्त्रक्रिया झाल्यानंतर मात्र ती आता चालायला लागली आहे.

मुंबई - मुंबईतील एका सार्वजनिक रुग्णालयात करण्यात आलेली गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्यामुळे ७२ वर्षांची महिला दोन वर्षे अंथरुणाला खिळली होती. भायखळ्यातील जे. जे. रुग्णालयात दोन शस्त्रक्रिया झाल्यानंतर मात्र ती आता चालायला लागली आहे.

वयोमानामुळे चालण्यास त्रास होत असल्यामुळे संबंधित महिलेवर एका सार्वजनिक रुग्णालयात गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर शस्त्रक्रियेच्या भागातून पू येणे, असह्य वेदना होणे आदी तक्रारी वाढू लागल्याने तिची तपासणी करण्यात आली. त्या वेळी प्रत्यारोपण झालेल्या भागात जंतुसंसर्ग झाल्याचे डॉक्‍टरांच्या लक्षात आले. तिच्यावर तातडीने दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतरही गुडघ्यातील संसर्ग दूर झाला नाही. परिणामी तिला दोन वर्षे अंथरुणात खिळून राहावे लागले. पहिल्या दोन शस्त्रक्रियांसाठी मोठा खर्च झाल्यामुळे पुढील उपचार घेणेही कठीण झाले होते. त्यांनी गेल्या वर्षाच्या अखेरीस जे. जे. रुग्णालयात उपचार घेण्यास सुरुवात केली. एक्‍स-रे आणि रक्ताच्या तपासणीत गुडघ्याच्या भागातील जंतुसंसर्ग कायम असल्याचे दिसले. त्यामुळे गुडघ्याजवळील हाड खराब झाले होते. रक्तपेशींनाही बाधा झाली होती. जंतुसंसर्ग झालेला भाग आणि पहिल्या शस्त्रक्रियेत बसवलेला कृत्रिम सांधा काढून टाकण्यात आला, अशी माहिती अस्थिव्यंग विभागाचे प्रमुख डॉ. एकनाथ पवार यांनी दिली. दोन शस्त्रक्रियांमध्ये रुग्णाला विश्रांतीची गरज होती. त्यामुळे महिलेला दीड महिना रुग्णालयातच ठेवण्यात आले. २१ फेब्रुवारीला शस्त्रक्रिया करून नवा कृत्रिम सांधा बसवण्यात आला. डॉ. पवार यांच्या नेतृत्वाखाली डॉ. संदीप गव्हाळे, डॉ. आरोही शर्मा आणि डॉ. विपुल शेठ यांनी भूलतज्ज्ञ डॉ. पूर्णिमा सोनकांबळे यांच्या उपस्थितीत शस्त्रक्रिया केली.

सामाजिक संस्थांची मदत
रुग्ण महिलेच्या गुडघ्याला योग्यप्रकारे आधार मिळावा म्हणून कर्करुग्णांवरील शस्त्रक्रियेत वापरला जाणारा खास कृत्रिम सांधा बसवण्यात आला, असे डॉक्‍टरांनी सांगितले. शस्त्रक्रियेसाठी आवश्‍यक साधने आणि औषधांचा खर्च सामाजिक संस्थांनी दिला.

Web Title: 72 year old woman surgery successful

टॅग्स