स्तनाच्या कर्करोगासंदर्भात 76% महिला सजग, न्यूबर्ग डायग्नोस्टीक सर्व्हेक्षणातून निष्कर्ष

मिलिंद तांबे
Friday, 30 October 2020

स्तनाच्या कर्करोगात स्व-परीक्षणाकरिता 70 टक्के महिला सजग दिसल्या तर नियमित स्व-परीक्षण करत असल्याचे 56 टक्के महिलांनी सांगितले. स्तनांच्या कर्करोगाबद्दल महिला किती प्रमाणात जागरूक आहेत यासाठी न्यूबर्ग डायग्नोस्टीकेने केलेल्या सर्व्हेक्षणातून हे निष्कर्ष समोर आले आहेत.

मुंबईः  स्तनाच्या कर्करोगात स्व-परीक्षणाकरिता 70 टक्के महिला सजग दिसल्या तर नियमित स्व-परीक्षण करत असल्याचे 56 टक्के महिलांनी सांगितले. स्तनांच्या कर्करोगाबद्दल महिला किती प्रमाणात जागरूक आहेत यासाठी न्यूबर्ग डायग्नोस्टीकेने केलेल्या सर्व्हेक्षणातून हे निष्कर्ष समोर आले आहेत.

न्यूबर्ग डायग्नोस्टीक ही भारताची चौथी सर्वात मोठी निदान शृंखला असून त्यांच्या वतीने स्तनाच्या स्व-परीक्षण, त्याचे महत्त्व आणि अनुवांशिक पैलू याविषयी स्तन कर्करोग जागरूकता सर्व्हेक्षण करण्यात आले. महिनांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत असले तरी 35 टक्के महिला स्तनांचे स्व-परीक्षण कधी न कसे करावे याविषयी जागरूक नसल्याचे समोर आले. शिवाय स्तनात बदल आढळल्यास पुढे काय करावे याबद्दल खात्री नसल्याचे 19 टक्के महिलांनी कबूल केले.

महिलांनी वयाच्या 20 व्या वर्षापासून स्तनांचे स्व-परीक्षण करणे गरजेचे असून आपल्या स्तनांच्या आकार आणि आकारमानाकडे लक्ष दिले पाहिजे. जेणेकरून एखादा बदल चटकन लक्षात येऊ शकतो असे अपोलो रूग्णालयाच्या ब्रेस्ट कँसर सर्जन डॉ. अनघा झोपे यांनी सांगितले. स्तनावर किंवा काखेत गाठ अथवा गठ्ठेदारपणा किंवा स्तनावर सूज, त्वचेवर दाह, स्तनाग्र किंवा स्तनावर लालसरपणा, आकार/आकारमानात बदल, छातीत दुखणे अथवा स्तनाग्रातून रक्तस्त्राव किंवा तत्सम सूचक लक्षणे स्तनाच्या कर्करोगाची असू शकतात. ही लक्षणे ओळखणे गरजेचे असून असे जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्क असल्याचे ही त्या पुढे म्हणाल्या. 

महिलांनी पाळीनंतर एका आठवड्याने स्वत:च आपल्या स्तनाची तपासणी करायला हवी. मासिक चक्राच्या ठराविक काळात स्तन फार कोमल किंवा कडक नसतात त्यामुळे दर महिन्याला एका ठराविक दिवशी तपासणी करावी. मेनोपॉजच्या (रजोनिवृत्तीच्या) काळात दर महिन्याच्या ठराविक तारखेला स्वत:च स्वत:ची तपासणी करावी असा सल्ला अपोलो रूग्णालयाच्या ब्रेस्ट ऑन्कोलॉजिस्ट जयंती थुमसी यांनी सांगितले. 

अधिक वाचाः  मुख्यमंत्र्यांचा उर्मिला मातोंडकरांना फोन, शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी उमेदवारी?

जेव्हा स्तनांमध्ये काही बदल दिसून येतील तेव्हा लगेच वैद्यकीय तपासणी करून घेण्यावर अॅस्टर मेडीसिटीच्या मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. अरुण वॉरियर यांनी भर दिला. कोरोना महासाथीमुळे अनेक स्त्रिया हल्ली रूग्णालयात जाण्यास घाबरतात.  परंतु, स्तनाचा कर्करोग जास्त पसरण्यापूर्वीच त्याला आळा घालणे गरजेचे असते.  लवकर निदान झाल्यास जगण्याची शक्यता वाढते असे ही डॉ. अरूण वॉरियर पुढे म्हणाले.

अनुवांशिक स्तन आणि ओव्हरी (अंडाशय) कॅन्सर सिंड्रोममुळे जीन्समध्ये (जनुकांमध्ये) होणाऱ्या बदलांमुळे 5-10 टक्के रुग्णांना स्तनाचा कर्करोग होतो. जनुकांमधील  मूलभूत बदल लक्षात आल्यास इतर अवयवांमधील कर्करोगचा धोका वेळीच ओळखता येतो आणि शस्त्रक्रियेतील धोके कमी करण्याच्या दृष्टीने निर्णय घेता येऊ शकतो असे न्यूबर्ग डायग्नोस्टीक्सच्या क्लिनिकल अनुवंशशास्त्रज्ञ डॉ. उधया कोटेचा यांनी सांगितले.

या सर्व्हेक्षणात मुंबई, पुणे, दिल्ली, अहमदाबाद, बेंगळूरू, चेन्नई, कोची आणि हैदराबाद येथील भारताच्या सुमारे 100 शहरांमधून 400 हून अधिक व्यक्तींनी प्रतिक्रिया नोंदवल्या. यामध्ये प्रतिक्रिया नोंदवणाऱ्यांचा वयोगट हा 18 आणि त्यावरील होता. पोस्ट ब्रेस्ट सर्वायव्हल आकडे पाहता भारतात ही टक्केवारी 60%  आहे तर अमेरिकेत 80% याप्रमाणे आहे.

अधिक वाचाः  मिठाईवर कालबाह्यता तारीख न लिहिल्याप्रकरणी FDAची कारवाई, विक्रेत्यांकडून 51 हजारांचा दंड वसूल

भारतातील स्तनाच्या कर्करोगात वाढ झाल्याचे दिसून येते. हार्मोनल असमतोल, मूल होण्याचे वय आणि जीवन शैलीतील बदल ही याची मुख्य कारणे आहेत.  स्तनाच्या कर्करोगापासून स्वत:चा जीव वाचविण्यासाठी लवकरात लवकर निदान होणे आवश्यक आहे.

आपल्या आजारांबाबत खुलेपणाने न बोलण्याचे प्रमाम्ण स्त्रियांमध्ये अधिक आढळते. वैद्यकीय आजारांबाबत कुटुंबांमध्ये फारशी चर्चा होताना दिसत नाही. जवळपास 50 टक्के लोकांना त्यांच्या कुटुंबाचा वैद्यकीय इतिहास माहित नसतो.

-----------------------------

(संपादनः पूजा विचारे)

76% Women Aware of Breast Cancer, Findings from Newberg Diagnostic Survey


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 76 Percent Women Aware of Breast Cancer Findings from Newberg Diagnostic Survey