या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फरफट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 जानेवारी 2020

ऑक्‍टोबर आणि नोव्हेंबरमध्ये रायगड जिल्ह्याला अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. यामध्ये 79 हजार शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले.

अलिबाग : ऑक्‍टोबर आणि नोव्हेंबरमध्ये रायगड जिल्ह्याला अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. यामध्ये 79 हजार शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले. त्यांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून 11 कोटी 30 लाखांचा निधी जिल्हा प्रशासनाला देण्यात आला असला, तरी अजून तब्बल 38 हजार 384 शेतकरी नुकसान भरपाईपासून दूर आहेत. त्यामुळे त्यांच्यात असंतोष खदखदत आहे. 

गेल्या खरीप हंगामात पावसाने जिल्ह्यातील शेतीचे वारंवार नुकसान केले. त्यावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनीही तितक्‍याच मेहनतीने वारंवार पेरणी आणि लावणी केली. या मेहनतीला फळ आले. अनेक भागांत भातासह अन्य पीके बहरली, परंतु ऑक्‍टोबर आणि नोव्हेंबरमध्ये अवकाळी पाऊस पडल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले. 

काैतुकास्पद : मायलेकींना वाचवणाऱ्यांची मुलाला शौर्यपदक

प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यातील 79 हजार 16 शेतकऱ्यांचे 26 हजार 624 हेक्‍टरचे नुकसान झाले. त्याचे पंचनामे तलाठी, कृषी सहायक आणि ग्रामसेवक यांनी केले आहेत. यानुसार सुमारे 18 कोटी रुपयांचे अपेक्षित नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून सरकारकडे पाठवण्यात आला होता. 

भारी बातमी : इथे आहे तान्हाजीची तलवार

सरकारनेही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सुमारे 11 कोटी 30 लाख रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला दिला असला, तरी आतापर्यंत 40 हजार 632 शेतकऱ्यांना निधी मिळाला आहे. उर्वरित 38 हजारपेक्षा अधिक शेतकरी तांत्रिक अडचणी, वेगवेगळ्या कागदपत्रांच्या पूर्ततेचा अभाव अशा अनेक कारणांमुळे भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. 
याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांच्याशी संपर्क झाला नाही. 

अजून पाच कोटींची आवश्‍यकता 
रायगड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी सरकारकडून जिल्हा प्रशासनाकडे टप्प्याटप्प्याने निधी वर्ग करण्यात आला आहे. 11 कोटी 30 लाखांचा निधी शासनाकडून मिळाला आहे; मात्र अजून सुमारे पाच कोटी रुपयांची आवश्‍यकता आहे. त्याची मागणी करण्यात आली आहे. 

शेतीच्या नुकसानीचे पंचनामे तलाठी, ग्रामसेवक कृषी सहायकांनी केले आहेत. त्यानंतरही भरपाई मिळाली नाही हे संतापजनक आहे. भरपाईसाठी जिल्हा आणि तालुका स्तरावरील प्रशासनाकडे यासाठी पाठपुरावा सुरू आहे. 
- प्रभाकर नाईक, शेतकरी, अलिबाग 

रायगड जिल्ह्याला अवकाळी आणि वादळी पावसाचा फटका बसला. त्यामध्ये शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले. विशेष म्हणजे कोकणातील शेतकरी मेटाकुटीला आला. त्यामुळे त्यांना सरसकट भरपाई देणे आवश्‍यक आहे. भरपाई देण्यास दिरंगाई होत असल्याने या वर्गात संताप आहे. हेसुद्धा पाहणे आवश्‍यक आहे. 
- चंद्रकांत मोकल, अध्यक्ष, शेतकरी संघटना 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 79,000 farmers suffered