नदीत बुडणाऱ्या मायलेकीला वाचवणाऱ्या मुलाला शौर्य पुरस्कार

Aurangabad news
Aurangabad news

औरंगाबाद : येथील एका छोट्याशा गावात राहाणाऱ्या शाळकरी मुलानं राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार पटकावला आहे. स्वत:च्या जिवाची पर्वा न करता त्यानं नदीत उडी घेऊन पाच वर्षीय मुलीचा आणि तिच्या आईचा जीव वाचवला होता.

हातमाळी या छोट्याशा गावात राहाणारा आकाश खिल्लारे शाळेत जात असताना त्याला नदीत बुडणाऱ्या मायलेकीची हाक ऐकू आली. या धाडसी आकाशने दप्तरासह तशीच पाण्यात उडी घेत या दोघींना पाण्यातून सुखरुप बाहेर काढले होते. त्याच्या या शौर्याची दखल घेत येत्या प्रजासत्ताक दिनाला त्याला पंतप्रधानांच्या हस्ते "राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार' देण्यात येणार आहे.

सध्या आयटीआयमध्ये शिक्षण घेणाऱ्या आकाश खिल्लारेवर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. गेल्या वर्षी त्या दिवशी झोपेतून उठायला उशीर झाला म्हणून आकाश धावत धावतच तीन किलोमीटर दूर असलेल्या शाळेकडे निघाला होता. त्याच्या सोबत त्याची बहिणसुध्दा होती.

गावाच्या नदीवरील बंधाऱ्यावर एक बाई कपडे धूत होती आणि शेजारी तिची पाच वर्षांची मुलगी खेळत होती. खेळत असताना ती मुलगी पाण्यात पडली. तिला वाचवण्यासाठी पोहता येत नसतानाही आईने पाण्यात उडी घेतली. त्यामुळे दोघीही पाण्यात बुडू लागल्या. 

जीव वाचवण्यासाठी आई मोठ्‌या आकांतानं 'वाचवा, वाचवा' असे ओरडत होती. मात्र त्यांना वाचवायला तिथं कुणीही नव्हतं. पुलावरुन शाळेत जात असताना आकाश आणि त्याच्या बहिणीनं त्यांना पाहिलं. आकाशनं कसलाही विचार न करता, दप्तरासह थेट नदीच्या डोहात उडी मारली. शेवाळ असलेल्या तीस फूट खोल पाण्यातून त्या मायलेकीला बाहेर काढणं मोठं जिकिरीचं काम होतं. परंतु, आकाशनं स्वताःच्या जिवाची पर्वा न करता या मायलेकींना पाण्याच्या बाहेर काढून त्यांचा जीव वाचवला. 

''नदीवर कपडे धूत असताना मुलगी पाण्यात पडली. तिला वाचवण्यासाठी मीही उडी मारली, पण पोहता येत नसल्यामुळे आम्ही दोघीही बुडायला लागलो. त्यावेळी मी देवाचा धावा करत होते. तेव्हा आकाशच्या रुपानं देवच भेटला. त्याने आम्हा मायलेकीला नवजीवन दिले," असे ती आई अजूनही अभिमानाने सांगते. 

आजोबांचा पोहण्याला होता विरोध

लहानपणी आकाशला नदीत पोहायची खूप हौस होती. तो चोरुन, लपून नदीवर पोहायला गेल्यावर त्याचे आजोबा त्याला मारायचे. मात्र, त्यानं लपून पोहायची शिकलेली कला आज कुणाचा तरी जीव वाचवायला कामी येत असल्यानं अभिमान वाटत असल्याचं ते त्याचे आजोबा सांगतात.

उत्कृष्ट कब्बडीपटू आकाश

आकाशचे आईवडील रामनगर, विठ्ठलनगर भागात केळी विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यामध्ये आकाशही सकाळी आईवडिलांना केळी विकण्यास मदत करतो. सध्या तो शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था-आयटीआयमध्ये शिकत आहे. दररोज दहा किलोमीटर सायकलवर प्रवास करुन आयटीआयला जातो. आयटीआयवरुन आल्यानंतर रोज पाच तास कापड दुकानात काम करतो. त्यानंतर घरी जाऊन आभ्यास करतो. आकाश हा उत्कृष्ट कबड्डीपटूही आहे. 

राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार

यंदा देशभरातून 23 शूर बालकांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. एक लाख रुपये रोख, पुस्तके खरेदी करण्यासाठी दहा हजार रुपये, संपूर्ण शिक्षण मोफत, तसेच भारतात सर्वत्र मोफत प्रवासाची सवलत, असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. येत्या २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आकाशचा गौरव केला जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com