९० लाख मुंबईकर बूस्टर डोसविना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

covid 19 vaccination

चीनमध्ये कोरोनाच्या बीएफ.७ या व्हेरिएंटने उच्छाद मांडला असताना देशात पुन्हा इशारा देण्यात आला आहे.

Corona Booster Dose : ९० लाख मुंबईकर बूस्टर डोसविना

मुंबई - चीनमध्ये कोरोनाच्या बीएफ.७ या व्हेरिएंटने उच्छाद मांडला असताना देशात पुन्हा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर बूस्टर डोस घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. मुंबईतील ९० लाख नागरिकांनी बूस्टर डोस चुकवल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. निव्वळ १६ टक्के नागरिकांनी डोस सत्र पूर्ण केल्याचे सांगण्यात आले.

वेगाने बाधित करणाऱ्या बीएफ.७ व्हेरिएंटचा धसका जगभरातील अनेक देशांनी घेतला आहे. चीनसह अमेरिकेतही हा व्हेरिएंट मोठ्या लोकसंख्येला बाधित करत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी सर्व राज्यांना सूचना दिल्या असून महाराष्ट्रात लसीकरणावर भर देण्यात येत आहे. मात्र मुंबईत बूस्टर डोस चुकविणाऱ्यांची संख्या लक्षणीय असल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे. ९० लाख मुंबईकरांनी बूस्टर डोस चुकवला असल्याचे सांगण्यात आले. हर्ड इम्युनिटी आणि हलगर्जीपणा यातून बूस्टर डोस चुकवणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत; मात्र जोखमीच्या आजाराचे रुग्ण आणि रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या वर्गाला या व्हेरिएंटचा धोका अधिक असल्याचा इशारा देण्यात येत आहे. त्यातून लसीकरण आणि बूस्टर डोस महत्त्वाचे झाले आहे. मात्र शहरात लसीकरणाचे पूर्ण डोस घेतलेल्यांची संख्या जास्त आहे.

डोसची अनुपलब्धता

मुंबईत कोविशिल्ड आणि कोर्बोवॅक्स लशीचे डोस उपलब्ध नाहीत. कोव्हॅक्सिनचे डोस सहा ते सात हजारापर्यंत उपलब्ध आहेत. मागणी वाढल्यास लशींची संख्या वाढवण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. लशीची मागणी राज्य, तसेच मुंबई महापालिकेकडून केंद्र सरकारकडे केल्याचे सांगण्यात आले आहे.

१६ टक्के मुंबईकरांनी बूस्टर डोस घेतलेला नाही. सध्या कोव्हॅक्सिन लशीचे सहा ते सात हजार डोस उपलब्ध आहेत. मात्र लोक बूस्टर डोस टाळत असून लसीकरण केंद्रांवर डोस घेणाऱ्यांची संख्या अल्प असते. लोक लशीसाठी आल्यास डोसही वाढवले जातील.

- डॉ. मंगला गोमारे, कार्यकारी आरोग्य अधिकारी, मुंबई महापालिका

दिवसभरात सात रुग्ण

मुंबई : शहरातून कोरोना हद्दपार होण्याची चिन्हे दिसू लागली असून शुक्रवारी (ता. २३) दिवसभरात सात कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्याने बाधित रुग्णांची संख्या ११,५५,०७४ वर पोहोचली आहे. दिवसभरात शून्य मृत्यूची नोंद झाल्याने मृतांची संख्या १९,७४६ वर स्थिरावली आहे. दिवसभरात पाच रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत ११,३५,२९१ रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. शहरात ३७ सक्रिय रुग्ण आहेत.