अबब! ४२ वर्षीय व्यक्तीच्या जबड्यातून काढला ९.५ सेंटिमीटरचा ट्यूमर; या रुग्णालयात झाली यशस्वी शस्त्रक्रीया

संदीप पंडित
Tuesday, 11 August 2020

 विरार येथील एका व्यक्तीला तंबाखुचे व्यसन जडले होते त्यातून त्याच्या जबड्यात चक्क ९. ५ सेंटिमीटरचा ट्युमर झाला होता. ९.५ सेंटिमीटरचा ट्यूमर काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे.

विरार - विरार येथील एका व्यक्तीला तंबाखुचे व्यसन जडले होते त्यातून त्याच्या जबड्यात चक्क ९. ५ सेंटिमीटरचा ट्युमर झाला होता. ९.५ सेंटिमीटरचा ट्यूमर काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. हा रूग्ण गेल्या कित्येक महिन्यांपासून कर्करोगाने त्रस्त होता. मीरारोड येथील वोक्हार्ट रूग्णालयात Bilateral neck dissection surgery ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या शस्त्रक्रियेमुळे रूग्णाला नव्याने आयुष्य मिळाले आहे.

ठाण्यात होणार कोरोनावर संशोधन! महापौरांचे मंजुरीसाठी आयुक्तांना साकडे...

अनिल राजपूत (नाव बदललेलं) असे या रूग्णाचे नाव असून ते व्यवसायाने कुरिअर मॅन आहेत. मागील दोन महिन्यांपासून त्यांच्या उजव्या जबड्याच्या खाली असह्य वेदना जाणवत होती. जबड्याला सूज आल्याने  स्थानिक डॉक्टरांकडून औषधोपचार सुरू होते. परंतु, तरीही त्रास कमी होत नव्हता.

जेवताना तोंड उघडतानाही येत नव्हते. त्रास वाढू लागल्याने कुटुंबियांनी त्यांना मीरारोड येथील वोक्हार्ट रूग्णालयात दाखल केलं. याठिकाणी डोके व मानेच्या कर्करोगावरील शल्यचिकित्सक डॉ. शीतल राडीया यांच्या नेतृत्वाखाली अन्य डॉक्टरांच्या चमूने त्यांच्यावर Bilateral neck dissection surgery ही शस्त्रक्रिया करून जबड्यातील ट्यूमर यशस्वीरित्या काढला. या शस्त्रक्रियेमुळे रूग्ण पुन्हा बोलू लागला आहे.

 

 ‘‘या रूग्णाला उजव्या जबड्याच्या खाली सूज व वेदना जाणवत होती. सीटीस्कॅन आणि बायोप्सी चाचणी अहवालात रूग्णाला डोके आणि मानेचा कर्करोग असल्याचे निदान झाले. हा कर्करोग चौथ्या टप्प्यात पोहोचला होता. तंबाखूजन्य पदार्थांच्या अतिसेवनामुळे हा कर्करोग होण्याचा धोका सर्वांधिक असतो. या रूग्णांमध्ये कर्करोगाचे गाठ जबड्यापर्य़ंत पोहोचली होती. अशा स्थितीत शस्त्रक्रिया करणं अवघड होतं. परंतु, डॉक्टरांनी हे आव्हान स्विकारले. या रूग्णावर शस्त्रक्रियेपूर्वी दोनदा केमोथेरपी देण्यात आली. त्यानंतर शस्त्रक्रिया करून जबड्यातील ही गाठ काढली.’’

   डॉ. अतुल नारायणकर ,
 कन्सल्टंट मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट

 

 

 ‘‘रूग्णाच्या उजव्या जबड्याच्या खालील बाजूला व्रण उठले होते. त्यामुळे त्यांना वेदना होत होती. अशा स्थितीत केमोथेरपी देऊन पूर्ण झाल्यानंतर एप्रिल आणि मे महिन्यात या रूग्णावर Bilateral neck dissection surgery ही शस्त्रक्रिया करून जबड्यात वाढलेला ट्यूमर काढून टाकला. हा ट्यूमर साधारणतः ९.५ सेंटिमीटर इतका मोठा होता. या शस्त्रक्रियेनंतर डॉ. अक्षय देशपांडे यांनी मांडीच्या स्नायूचा वापर करून जबडा पुन्हा तयार केला. पाच तास ही प्रक्रिया चालली. या शस्त्रक्रियेनंतर सात दिवसांनी रूग्णाला घरी सोडण्यात आले आहे. आता हा रूग्ण पूर्वीप्रमाणे बोलू शकतोय.’’

  डॉ. शीतल राडीया ,
  कर्करोग शल्यचिकित्सक

--------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A 9.5 cm tumor was removed from the jaw of a 42-year-old man; Successful surgery was performed at this hospital