
Aaditya Thackeray : जिजामाता प्राणिसंग्रहालयातील कामाचा मला आणि उद्धवजींना अभिमान; आदित्य ठाकरे
मुंबई : राजकारणातील मंडळींकडून जिजामाता उद्यानातील प्राण्यांच्या नावावरून मला चिडवले जायचे. परंतु हा द्वेष करणाऱ्यांनी नुकताच जिजामाता उद्यानाला भेट देणाऱ्यांचा आकडा पहावा. मुंबई महानगरपालिकेच्या मदतीने जिजामाता प्राणिसंग्रहालयात मी आणि उद्धवजींनी जे साध्य केले आहे.
त्याचा अभिमान असल्याचे ट्विट युवा सेनेचे अध्यक्ष आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी केले आहे. मुंबईच्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय येथे वर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या रेकॉर्डब्रेक पर्यटकांचा आकडा शेअर करत आदित्य ठाकरेंनी हे ट्विट केले.
महानगरपालिकेच्या भायखळा स्थित वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाला आज रविवारी (१ जानेवारी २०२३) अर्थात इंग्रजी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तब्बल ३२ हजार ८२० इतक्या पर्यटकांनी भेट दिली.
या विक्रमी संख्येमुळे यापूर्वीचा एकाच दिवशी पर्यटक भेटीचा दिनांक ६ नोव्हेंबर २०२२ रोजीचा विक्रम मागे टाकून या प्राणिसंग्रहालयाने आपल्या शिरपेचात आज नवीन तुरा खोवला आहे. यापूर्वी दिनांक ६ नोव्हेंबर २०२२ रोजी एकाच दिवशी ३१ हजार ८४१ पर्यटकांनी या प्राणिसंग्रहालयाला भेट देऊन विक्रमी संख्येची नोंद केली होती.
त्या दिवशी सुमारे ११ लाख १२ हजार ९२५ रुपयांचे महसुली उत्पन्न महानगरपालिकेच्या तिजोरी जमा झाले होते. हा विक्रम १ जानेवारी २०२३ रोजी मोडीत निघाला आहे. आज एकाच दिवसात तब्बल ३२ हजार ८२० पर्यटकांनी या प्राणिसंग्रहालयाला भेट दिली.
त्यातून सुमारे १३ लाख ७८ हजार ७२५ रुपयांचे महसुली उत्पन्न प्राप्त झाले. यामध्ये ऑफलाईन पद्धतीने २७ हजार २६२ पर्यटकांनी भेट दिली. त्यातून ९ लाख ६० हजार ७२५ रुपये उत्पन्न मिळाले. तर ऑनलाईन नोंदणी करून ५ हजार ५५८ जणांनी भेट दिली. यातून ४ लाख १८ हजार रुपयांची तिजोरीत भर पडली.