esakal | कौतुकास्पद! मुंबईकरांसाठी आदिवासी महिलांचे सुदाम्याचे पोहे; कोरोना लढ्यासाठी दिले मास्क..  
sakal

बोलून बातमी शोधा

women making masks

खासदार पूनम महाजन यांनी पालघर जिल्ह्यातील चारोटी हे आदिवासीबहुल गाव दत्तक घेऊन तेथील महिलांचे सक्षमीकरण केले. त्या महिलांनी त्याची जाण ठेऊन

कौतुकास्पद! मुंबईकरांसाठी आदिवासी महिलांचे सुदाम्याचे पोहे; कोरोना लढ्यासाठी दिले मास्क..  

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई : खासदार पूनम महाजन यांनी पालघर जिल्ह्यातील चारोटी हे आदिवासीबहुल गाव दत्तक घेऊन तेथील महिलांचे सक्षमीकरण केले. त्या महिलांनी त्याची जाण ठेऊन कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मुंबईकरांना साथ देण्यासाठी मास्क तयार करून ते वापरण्यासाठी पाठवून दिले. 

चारोटी हे पाच हजार वस्तीचे गाव पूनम महाजन यांनी 2016 मध्ये दत्तक घेतले. कोणत्याही दुर्गम खेड्याप्रमाणेच येथे गरीबी, अशिक्षितपणा, बेकारी, आरोग्यसुविधा नाहीत, वीजही नाही, पैशांची टंचाई अशी अवस्था होती. शेजारच्या दीड हजार वस्तीच्या वाघाडी खेड्याचीही तशीच अवस्था होती. 

हेही वाचा: वाढीव वीजबिलांविरोधातील याचिकेवर मुंबई उच्च न्यालयाने दिला निकाल, हायकोर्ट म्हणतंय...

मात्र फॅशन डिझायनर अनिता डोंगरे यांच्या तसेच कुशल मेहरा आदी हितचिंतकांच्या साह्याने महाजन यांनी त्या गावातील महिलांना स्वयंपूर्ण केले. इतकेच नव्हे तर या दोनही गावांचा विकासही केला. त्याची जाण ठेऊन या महिलांनी कृतज्ञतेपोटी फूल ना फुलाची पाकळी म्हणून मुंबईकरांसाठी मास्क पाठवले आहेत. हे मास्क आता मतदारसंघात वाटले जातील, असे पूनम महाजन यांनी सकाळ ला सांगितले. 

पंतप्रधान संसद आदर्श ग्राम योजनेनुसार हे गाव दत्तक घेतल्यावर महाजन यांनी गावाचे सर्वेक्षण केले व समस्या जाणून घेतल्या. तेथे घरांमध्ये स्वच्छतागृहे नव्हती, गावात अनेक ठिकाणी वीज नव्हती, शाळेत वीज नसल्याने शिक्षणाचा आनंद होता, आरोग्यसुविधा नव्हत्या, गावाबाहेरच्या नदीवर पूल नसल्याने पावसाळ्यात मुलांची शाळा बंद होत असे. त्यामुळे प्रथम या गावात वीज आणली गेली. ज्या घरांना वीजबिल परवडत नव्हते त्यांच्यासाठी टाटा फाऊंडेशनच्या सहकार्याने सौरउर्जा आणली. 

बँक खाती उघडून बारा हजारांचे अनुदान त्यात जमा करून दीडशे घरांमध्ये बायोटॉयलेट तयार केली. पंतप्रधान आवास योजनेनुसार प्रत्येकी दीड लाख रुपये खर्चून शंभर घरे बांधली. अनेकांच्या घरांची दुरुस्ती केली, शाळेची डागडुजी करून तेथे वीज आणली व इ लर्निंगसाठी वर्ग तयार केला. ठक्करबाप्पा योजनेनुसार काही लाख रुपये खर्चून जलकुंभ केला, रस्ते तसेच नदीवर छोटा पूल बांधला. दारिद्र्यरेषेखालील लोकांना सायकली दिल्या.  

हेही वाचा: BIG NEWS - 'राजगृह'वर हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीबाबत धक्कादायक माहिती आली समोर, पोलिस म्हणतात...

महिलांसाठी तेथे टेलिहेल्थ कँप घेतले, यात मुंबईतील डॉक्टर त्यांना दूरध्वनी किंवा संगणकामार्फत संपर्क साधून तपासणी व सल्ला देऊ लागले. तेथील एका समाजकेंद्राचे रुपांतर महिलांच्या शिक्षणसंस्थेत केले व त्यांना दोन-तीन महिन्यांचे शिवणकामाचे प्रशिक्षण दिले. तेथे शिवणयंत्रे नेऊन अनिता डोंगरे यांच्या साह्याने तेथे कपडेनिर्मितीचे युनिटच उभारण्यात आले. त्यामुळे चारोटी व वाघाडी या दोनही गावांमधील दीडशे-दोनशे महिलांना रोजगार मिळू लागला. याच महिलांनी आता मास्क पाठवले असून ते मुंबईत वापरले जातील, असे महाजन यांनी सांगितले.

संपादन : अथर्व महांकाळ 

aadiwasi women made face masks for mumbai people