आराध्याच्या वाढदिवसाला मिळावी हृदयाची भेट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

आई-वडिलांची इच्छा, प्रत्यारोपणासाठी वर्षभरापासून प्रतीक्षा
मुंबई - तीन वर्षांच्या आराध्याला जगायचं आहे, मोठं होऊन जग पाहायचं आहे. येत्या रविवारी (ता.5) तिचा वाढदिवस आहे. कोणीतरी दाता मिळेल, तिला हृदयाची भेट मिळेल, अशा भाबड्या आशेवर तिचे आई-वडील आहेत.

आई-वडिलांची इच्छा, प्रत्यारोपणासाठी वर्षभरापासून प्रतीक्षा
मुंबई - तीन वर्षांच्या आराध्याला जगायचं आहे, मोठं होऊन जग पाहायचं आहे. येत्या रविवारी (ता.5) तिचा वाढदिवस आहे. कोणीतरी दाता मिळेल, तिला हृदयाची भेट मिळेल, अशा भाबड्या आशेवर तिचे आई-वडील आहेत.

आराध्या डायलेटेड कार्डिओमायोपॅथीची (डीसीएम) रुग्ण असल्याचे निदान झाल्यानंतर मुळे कुटुंब हादरलं. तिचं हृदय केवळ 10 टक्के क्षमतेने काम करतं. त्यामुळे प्रत्यारोपणाचा पर्याय पुढे आला. तिचं नाव ऑक्‍टोबर 2016 मध्ये हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी नोंदवण्यात आलं. तेव्हापासून तिचे आई-वडील आज ना उद्या दाता मिळेल, या आशेवर आहेत.

दोन फोन आले होते. दाता मिळेल असं वाटलं होतं. प्रत्यक्षात तशी परिस्थिती न उद्‌भवल्याने अवयवदान झालेच नाही. अवयवदानाबाबत जागृती झाल्यानंतर लोक येऊन भेटून जातात. आर्थिक मदत मिळाली आहे, असे तिची आई प्रतिभा मुळे यांनी सांगितलं.

मुलुंडच्या फोर्टीस रुग्णालयात आराध्यावर उपचार सुरू आहेत. तेथेच तिच्यावर हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

आराध्याला सुरुवातीला दोन महिन्यांतून एकदा एक इंजेक्‍शन घेण्यासाठी रुग्णालयात न्यावं लागत होतं. आता दर 15 दिवसांनी तिला दोन दिवसांसाठी रुग्णालयात दाखल करून एक इंजेक्‍शन देण्यात येतं. या इंजेक्‍शनमुळे तिच्या हृदयाचे ठोके सुरळीत व्हायला मदत होते. या शिवाय तिच्या खाण्याच्या आणि पाणी पिण्याच्या सवयींवरही बंधने आहेत. एक दिवसाआड तिला शरीरात साठलेले पाणी बाहेर फेकण्यासाठी गोळी द्यावी लागते. बाहेरचं खायला डॉक्‍टरांनी मज्जाव केला होता, पण तिच्या हट्ट करण्यामुळं हृदयावर ताण येऊ नये यासाठी त्यांनी ही अट शिथिल केल्याचं प्रतिभा यांनी सांगितलं. दहा पावलं चालल्यानंतर आराध्याला धाप लागते. बाहेर जाताना तिला कडेवर घ्यावं लागतं. प्रत्यारोपणानंतर तिला इतर मुलांसारखं खेळताना पाहायचं आहे, अशा शब्दांत प्रतिभा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

वडिलांचा संघर्ष
आराध्याचे वडील योगेश मुळे यांनी आराध्यासाठी save aaradhya या नावाने फेसबुक पेज सुरू केलं आहे. आराध्याची आई आणि त्यांच्या माहेरच्यांना ते आधार देतात. रडण्याने आराध्याला मदत मिळणार नाही, त्यासाठी शक्‍य ते सर्व प्रयत्न आपण करू या, असं ते त्यांना समजावतात.

डीसीएम वस्तुस्थिती
- कार्डियोमायोपॅथी झाल्याचे निदान झाल्यानंतर वर्षभरात मृत्यू होण्याचे प्रमाण सर्वाधिक
- अमेरिकेत अठरा वर्षांखालील एक लाख मुलांमागे एकाला आजार
- लहान मुलांसाठी हृदय मिळणे अशक्‍य असते

काय झालंय आराध्याला?
मायोकार्डीटीसच्या संसर्गामुळे आराध्याच्या हृदयाची कार्यक्षमता कमी झाली. हा संसर्ग झाल्यानंतर 1 ते 5 टक्के मुलांमध्येच अवयव प्रत्यारोपणाची आवश्‍यकता असते. आराध्याचं हृदय आता 10 टक्के क्षमतेनेच काम करीत आहे. 40 किलोपर्यंत वजन असलेल्या व्यक्तीचं हृदय आराध्याला लागणार आहे. ए पॉझिटिव्ह किंवा ए निगेटिव्ह, तसेच ओ पॉझिटिव्ह आणि ओ निगेटिव्ह रक्तगटाच्या दात्याचं हृदय आराध्याला चालणार आहे.

Web Title: Aaradhya's birthday gift to get the heart