'आरे'तील कारशेडचा शिवसेनेचा विरोध मावळला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मे 2017

मुंबई - आरेच्या हरित पट्ट्यावर मुंबई मेट्रो-3 च्या कारशेड उभारणीच्या विरोधात आक्रमक झालेल्या शिवसेनेची सुधार समितीतील भूमिका गुरुवारी (ता. 11) संदिग्ध दिसली. शिवसेनेचा विरोध अचानक कसा मावळला, असा प्रश्‍न समिती सदस्यांना पडला आहे. भाजपने केलेल्या पाहणी दौऱ्याच्या मागणीला विरोध न करता शिवसेनेने भाजपच्या सुरात सूर मिसळले. कॉंग्रेसने मात्र आक्रमक भूमिका घेत विरोध केला आहे.

मेट्रो-3 च्या कारशेडसाठी आरे वसाहतीची जागा निश्‍चित झाली आहे. मुंबईच्या प्रस्तावित विकास आराखड्यात कारशेडसाठी जागेचे आरक्षण आहे. आरेच्या एकूण जागेपैकी 33 हेक्‍टर जागा मेट्रो कारशेड, वर्कशॉप, वाणिज्य वापरासाठी आरक्षित करा, असा प्रस्ताव नगरविकास विभागाने पालिकेकडे पाठवला आहे. त्या सूचनेनुसार पालिका प्रशासनाने आरेतील आरक्षणात बदल करण्याचा प्रस्ताव सुधार समितीच्या बैठकीसमोर ठेवला. मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या कारशेडसाठी विविध ठिकाणी सात जागा निवडल्या असताना आरे व कांजूर मार्ग येथील दोनच जागांचा विचार का केला जातो, असा सवाल गुरुवारी समितीच्या बैठकीत कॉंग्रेसच्या सदस्यांनी केला.

चार हजार झाडांचा बळी देऊन कारशेड उभारल्यास पर्यावरणाचा ऱ्हास होईल. स्थानिकांचा विरोध झुगारून कारशेड का उभारली जात आहे, असा सवाल या वेळी कॉंग्रेसचे अशरफ आझमी यांनी केला. इतर पाच जागा नेमक्‍या कुठे आहेत, याची माहिती द्या, अशी मागणीही त्यांनी केली. त्यावर भाजपच्या उज्ज्वला मोडक यांनी या जागेच्या पाहणीची मागणी केली. शिवसेनेनेही त्यांना पाठिंबा दिला. आरेच्या या प्रकल्पाला असलेला शिवसेनेचा विरोध अचानक कसा मावळला, याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. पुढील आठवड्यात आरेतील कारशेडच्या जागेची पाहणी केली जाईल, अशी माहिती समितीचे अध्यक्ष बाळा नर यांनी दिली.

आम्ही विरोध करू - रवी राजा
भाजपने मेट्रोसाठीच्या जागांची पाहणी करण्याची मागणी केली होती. पाहणी दौरा करायचाच असेल, तर कांजूर मार्गलाही करा. शिवाय उर्वरित पाच जागा कोणत्या, त्या का सांगितल्या जात नाहीत, असा सवाल विचारत "आरे'च्या हिरवळीवर कारशेड उभारण्याचा निर्णय घेतल्यास विरोध करू, असा इशाराही कॉंग्रेसचे पालिकेतील गटनेते रवी राजा यांनी दिला.

Web Title: aare colony car shade no oppose by shivsena