esakal | 'स्मशानभूमीत जागा नसेल तर रुग्णालयातून मृतदेह बाहेर काढू नका'
sakal

बोलून बातमी शोधा

High Court

'स्मशानभूमीत जागा नसेल तर रुग्णालयातून मृतदेह बाहेर काढू नका'

sakal_logo
By
सुनिता महामुणकर - सकाळ वृत्तसेवा

मुंबई: कोरोना संसर्गात मृत्यु झालेल्या रुग्णांच्या अंत्यविधीसाठी नातेवाईकांना तासनातास स्मशानभूमीत प्रतिक्षा करावी लागत असल्याची दखल मुंबई उच्च न्यायालयाने आज घेतली. मृतदेहांना दफन आणि दहनभूमीत तिष्ठत ठेवू नका, जर स्मशानभूमीत जागा नसेल तर रुग्णालयातून मृतदेह बाहेर काढू नका, असे निर्देश न्यायालयाने राज्य सरकार आणि सर्व प्रशासनांना दिले आहेत.

राज्यातील विविध भागात कोरोना रुग्णांच्या मृत्युंची संख्या वाढत आहे. त्यामुळे दहन आणि दफन भूमीमध्येही नातेवाईकांना अंतिम विधीसाठी ताटकळत रहावे लागत आहे. मुख्य न्या दिपांकर दत्ता आणि न्या गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने मंगळवारी याबाबत महापालिका आणि राज्य सरकारला निर्देश दिले. सरकारने तातडीने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश द्यावे कि 'मृतदेहाच्या अंतिम विधीसाठी नातेवाईकांना प्रतिक्षा करायला लावू नये, जर स्मशानभूमीत जागा नसेल तर मृतदेह ताब्यात देऊ नका, नातेवाईकांना स्मशानभूमीत वाट पाहायला लावू नका, असे खंडपीठ म्हणाले.

हेही वाचा: सकारात्मक बातमी, डॉक्टरांनी फक्त २४ तास दिले होते, पण...

बीड जिल्ह्यात एका रुग्णवाहिकेमध्ये बारा मृतदेह ठेवण्यात आले होते, असे खंडपीठाने निदर्शनास आणले. त्याचबरोबर सोशल मीडियावरील काही व्हिडीओमध्ये देखील नातेवाईकांची स्मशानभूमीबाहेरील रांग दिसत होती. या सर्वांची नोंद खंडपीठाने घेतली.

राज्य सरकारने तातडीने आज संध्याकाळपर्यत सर्व जिल्हाधिकारी प्रशासनाला याबाबत आदेश द्यावे. रुग्णांच्या नातेवाईकांना स्मशानभूमीबाहेर वाट बघायला लावू नका, मृतदेह अंतिम विधीबाबत नियोजन करावे, असे खंडपीठ म्हणाले. अनेक दफन आणि दहनभूमीत त्रुटी आहेत त्या अद्ययावत करण्याचे निर्देशही खंडपीठाने दिले. तसेच पुढील सुनावणीत याबाबत आकडेवारी, प्रक्रिया, नियोजन याबाबत सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले. पुढील सुनावणी ता. 29 रोजी होणार आहे.

मुंबई महापालिकेच्या कोविड 19 संबंधित वॉर रुमची चाचणी आज थेट मुंबई उच्च न्यायालयाने घेतली. न्यायालयातील याचिकादारांच्या वकीलांना, एड सिमिल पुरोहित यांना खंडपीठाने हेल्पलाईन 1916 ला फोन करायला सांगितले. हा फोन तेथील ऑपरेटरने उचलला आणि रुग्णाचे राहण्याचे ठिकाण विचारले. यावर वकिलाने वरळी असे उत्तर दिले. मग वरळीच्या वॉर रुमचा नंबर ऑपरेटरने वकिलांना दिला. या नंबरवर फोन केल्यावर, रुग्णाचा वैद्यकीय अहवाल पाठवा, असे सांगितले.

अहवाल महापालिकेच्या डॉक्टरांना पाठवून ते रुग्णांना माहिती देतील, असे महापालिकेच्या वतीने एड अनील साखरे यांनी सांगितले. तूर्तास मुंबईमध्ये रेमिडीसीवीर आणि ऑक्सिजन साठा पुरेसा आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. हेल्पलाईन नेटकी ठेवावी, आणि स्मशानभूमीतील सर्व विद्युतदाहिनी सुरळीत चालू कराव्यात, असे निर्देश न्यायालयाने महापालिकेला दिले.

loading image
go to top