ठाणे पालिका आयुक्‍तांवर अबू आझमी यांची नाराजी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जुलै 2018

वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधीबरोबर कशाप्रकारे वागणूक ठेवावी, याचा जीआर निघालेला आहे. मात्र, आयुक्त जयस्वाल यांनी त्या जीआरचे पालन केले नसल्याचा आरोप आझमी यांनी केला.

ठाणे : ठाणे महापालिका आयुक्‍त संजीव जयस्वाल यांच्या कार्यपद्धतीवर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी नाराजी व्यक्‍त केली आहे. आझमी हे शनिवारी महापालिका मुख्यालयात गेले होते. या भेटीदरम्यान आयुक्‍तांनी एक आमदार म्हणून आपला योग्य सन्मान राखला नाही, असा आरोप आझमी यांनी केला आहे. या संदर्भात पावसाळी अधिवेशनात जाब विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधीबरोबर कशाप्रकारे वागणूक ठेवावी, याचा जीआर निघालेला आहे. मात्र, आयुक्त जयस्वाल यांनी त्या जीआरचे पालन केले नसल्याचा आरोप आझमी यांनी केला. नागरिकांच्या समस्या घेऊन एखादा आमदार ज्या वेळी आयुक्तांना निवेदन देतो, त्या वेळी त्यांनी निवेदन उभे राहून स्वीकारणे अपेक्षित असते; मात्र आयुक्त जयस्वाल यांनी बसूनच निवेदन स्वीकारले. जयस्वाल हे एक अहंकारी आयुक्त आहेत, असा आरोप आझमी यांनी केला. 

अपॉईंटमेंट नव्हती : जयस्वाल 

आझमी यांनी अपॉईंटमेंट घेतली नव्हती. त्यामुळे अधिकाऱ्यांची उपस्थिती नसताना आझमी यांच्या निवेदनावर मी अचानक काय उत्तर देणार? जर आझमी यांनी नागरिकांचा विषय कळवून निवेदनासाठी भेट घेतली असती, तर संबंधित विषयाची माहिती घेऊन त्यावर तोडगा काढता आला असता. तसेच या भेटीत आपण कोणताही अहंकार दाखवलेला नाही, असे स्पष्टीकरण आयुक्‍त जयस्वाल यांनी दिले. 

Web Title: Abu Azmi nervous on Thane municipal commissioner