पीएमसी बॅंक घोटाळ्यातील आणखी एका खातेदाराचा बळी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

खारघर : गुंतवणुकीच्या परताव्याच्या चिंतेने हृदयविकाराचा झटका; १७ लाख अडकले

नवी मुंबई : पीएमसी बॅंकेत अडकलेले पैसे मिळतील की नाही, या चिंतेत असलेल्या आणखी एका खातेदार महिलेचा हृदयविकाराच्या झटक्‍याने मृत्यू झाल्याची घटना खारघरमध्ये घडली. कुलदीपकौर विग (६४) असे या मयत झालेल्या महिलेचे नाव असून त्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे पीएमसी बॅंकेमध्ये सुमारे १७ लाख रुपये अडकले आहेत. दरम्यान, कुलदीपकौर या बुधवारी रात्री पीएमसी बॅंकेसंदर्भातील बातम्या पाहून झोपी गेल्यानंतर दोन तासातच त्यांचा हृदयविकराने मृत्यू झाला.

कुलदीपकौर विग या खारघरमधील सेक्‍टर-१० मध्ये पती, मुलगा, सून व विधवा मुलगी यांच्यासह भाड्याच्या खोलीत राहत होत्या. पीएमसी बॅंकेत कुलदीपकौर यांच्यासह पती वरिंदरसिंग व मुलगा सुखबिरसिंग या तिघांचे खाते असून त्यांची फिक्‍स डिपॉझिटच्या स्वरूपात बॅंकेत गुंतवणूक केलेली एकूण १५ लाख रुपयांची रक्कम अडकली आहे. 

तसेच कुलदीपसिंग व वरिंदरसिंग या पती-पत्नीच्या खात्यामध्ये दीड लाख रुपयांची; तर सुखबीर यांच्या खात्यामध्ये ७० हजाराची रक्कम होती. मात्र घोटाळ्यामुळे पीएमसी बॅंकेवर निर्बंध लादण्यात आल्यानंतर देशभरातील हजारो खातेदारांचे पैसे या बॅंकेत अडकले असून त्यात खारघरमध्ये रहाणाऱ्या विग कुटुंबीयांचे देखील सुमारे १७ लाख रुपये अडकले आहेत.

पैसे नसल्याने विग कुटुंबीयांनी या वर्षी दिवाळीदेखील साजरी केली नाही. त्यामुळे बॅंकेत अडकलेली ही रक्कम मिळेल की नाही, या चिंतेत विग कुटुंबीय होते. आपल्या ठेवी व पैसे बुडतील अशी भीती कुलदीपकौर यांना होती.

बुधवारी (ता. ३०) रात्री जेवणानंतर टीव्हीवर पीएमसी बॅंकेच्या बातम्या बघितल्यानंतर झोपण्यापूर्वी त्यांनी पतीशी बॅंकेत अडकलेल्या पैशांसंदर्भात चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर झोपल्यानंतर दोन तासातच त्यांना त्रास जाणवू लागला. मुलाने व पतीने त्यांना तत्काळ रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा हृदयविकाराचा झटक्‍याने मृत्यू झाला होता.

गुंतवणुकीच्या चिंतेनेच झटका
मयत कुलदीपकौर यांची मुलगी विधवा असल्याने भविष्यात तिला व तिच्या मुलांना आर्थिक मदत मिळावी, या उद्देशाने कुलदीप कौर आणि त्यांचे पती वरिंदरसिंग विग यांनी पीएमसी बॅंकेत १५ लाख रुपयांचे फिक्‍स डिपॉझीट ठेवले होते. मात्र घोटाळ्यानंतर बॅंकेत रक्कम अडकल्याने सदर रक्कम बुडण्याची चिंता कुलदीपकौर यांना सतावत होती. याच चिंतेतूनच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: account holder's death of PMC Bank scam in Kharghar