अखेर 27 वर्षांनंतर आरोपीला अटक 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 मे 2017

21 जून,1991 मध्ये गुन्हे शाखेने याप्रकरणी अकबर शेख(22) व मोहम्मद युसुफ सत्तार(24) या दोघांना अटक केली होती. पण त्याचा तिसरा साथीदार जमशेद पोलिसांच्या हाती लागला नव्हता. गेल्या 27 वर्षांपासून जमशेद स्वतःची ओळख बदलून वावरत होता

मुंबई - 27 वर्षांपासून पोलिसांचा ससेमिरा चुकवणा-या सशस्त्र दरोड्यातील आरोपीला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना अखेर यश आले आहे. जमशेद इमामुद्दीन पठाण(48) असे अटक आरोपीचे नाव असून तो गोवंडी येथील रहिवासी आहे.

कुलाबा येथील सोविनियर इमारीतील घरात 10 मे, 1991 मध्ये तिघांनी सशस्त्र दरोडा घातला होता. त्यात रोख रक्कम, सोन्याचे दागिने, महागडे घड्याळ असा 47 हजारांचा मुद्देमाल आरोपीनी पळवला होता. याप्रकरणी पद्मा ईश्‍वरलाल मेलवानी(63) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढे तपासासाठी हा गुन्हा गुन्हे शाखेला वर्ग करण्यात आला होता. 21 जून,1991 मध्ये गुन्हे शाखेने याप्रकरणी अकबर शेख(22) व मोहम्मद युसुफ सत्तार(24) या दोघांना अटक केली होती. पण त्याचा तिसरा साथीदार जमशेद पोलिसांच्या हाती लागला नव्हता. गेल्या 27 वर्षांपासून जमशेद स्वतःची ओळख बदलून वावरत होता.

अखेर गुन्हे शाखेच्या कक्ष 6 च्या पोलिसांना खब-याकडून मिळालेल्या माहितीवरून, गोवंडी परिसरात शनिवारी रात्री सापळा रचण्यात आला. त्यात अखर पठाणला ताब्यात घेण्यात आले. हे प्रकरण गुन्हे शाखेच्या कक्ष-3 कडे असल्यामुळे जमशेदला त्यांच्या ताब्यात देण्यात आले. 

Web Title: accused arrested after 27 years