पादचाऱ्यांना चिरडणाऱ्या आरोपीला कठोर शासन होईल  : संजय कुमार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

कामोठे कार अपघात प्रकरणात कोणाचीही हयगय केली जाणार नाही. मग तो आरोपी असो वा त्याला वाचवण्यासाठी सरसावलेले कोणीही असोत, असा  इशारा नवी मुंबईचे पोलिस आयुक्त संजय कुमार यांनी दिला. 

नवी मुंबई  - कामोठे कार अपघात प्रकरणात कोणाचीही हयगय केली जाणार नाही. मग तो आरोपी असो वा त्याला वाचवण्यासाठी सरसावलेले कोणीही असोत, असा  इशारा नवी मुंबईचे पोलिस आयुक्त संजय कुमार यांनी दिला. 

रविवारी संध्याकाळी कारचालकाने भरधाव कार चालवून 2 जणांना चिरडून टाकल्यानंतर संबंधित कारचालकाला भाजप नेत्याच्या मध्यस्थीने पोलिस वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी बातमी 'सकाळ'ने सोमवारच्या अंकात दिली होती. त्याचे पडसाद आज पोलिसआयुक्तालयात  उमटले.

पोलिस आयुक्त संजय कुमार यांच्या कार्यालयात सकाळी पार पडलेल्या बैठकीत संजय कुमार यांनी कामोठे अपघात प्रकरणातील तपासाची माहिती जाणून घेतली. या वेळी 'सकाळ'च्या बातमीचा हवाला देत परिमंडळ -2 च्या पोलिस अधिकाऱ्यांची झाडाझडती केली. या प्रकरणात आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा कशी होईल, या दिशेने तपास करण्याच्या सूचना संजय कुमार यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या. 

रविवारी अपघात घडला तेव्हा अपघातात जखमी झालेल्या अपघातग्रस्तांना विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील श्रद्धा जगतापी या महिलेची साधी माहितीदेखील पोलिसांना अखेरपर्यंत मिळू शकली नाही.  त्या एका खासगी रुग्णालयातून उपचार घेऊन घरी परतल्या होत्या.

या प्रकरणातील आरोपी हरविंदर सिंग हा पोलिसांना चकवा देऊन रुग्णालयात भरती होतो. पोलिसांना गाडीत दारूची बाटली न सापडणे या बाबींवरून पोलिस काही प्रमाणात आरोपीला मदत करीत असल्याची शंका नागरिकांकडून उपस्थित होत आहे. अपघातातील जखमींना कोणत्या रुग्णालयात भरती केले याची पोलिसांना माहिती नसल्यावरून या प्रकरणात पोलिस दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.

कामोठे अपघात प्रकरणात मी स्वतः जातीने लक्ष घालत आहे. या प्रकरणात आरोपीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना मी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांबद्दल सहानुभूती आहे; पण कोणाला ही मध्यस्थी करू देणार नाही.
- संजय कुमार, पोलिस आयुक्त, नवी मुंबई


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The accused in the Kamothe car accident case will face severe punishment