ठाणे जिल्ह्यात बोगस डॉक्‍टरांचा सुळसुळाट, वर्षभरात 37 जणांवर गुन्हे दाखल

राहुल क्षीरसागर
Wednesday, 21 October 2020

कोरोनारुग्णांवर उपचार करणारे डॉक्‍टरच बोगस निघाल्याची बाब ठाणे शहरात समोर आली. त्यामुळे जिल्ह्यातील बोगस डॉक्‍टरांचा प्रश्न ऐरणीवर आला असताना, मागील वर्षभरात ठाणे महापालिका क्षेत्रात 8; तर ग्रामीण भागात आतापर्यंत 29 बोगस डॉक्‍टरांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. 

ठाणे : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी सरकारी व खासगी रुग्णालयातील जागा कमी पडू लागल्याने जिल्ह्यात संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोव्हिड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. या केंद्रांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत; मात्र या ठिकाणी कोरोनारुग्णांवर उपचार करणारे डॉक्‍टरच बोगस निघाल्याची बाब ठाणे शहरात समोर आली. त्यामुळे जिल्ह्यातील बोगस डॉक्‍टरांचा प्रश्न ऐरणीवर आला असताना, मागील वर्षभरात ठाणे महापालिका क्षेत्रात 8; तर ग्रामीण भागात आतापर्यंत 29 बोगस डॉक्‍टरांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. 

क्लिक करा : कल्याणच्या जलवाहतुकीवर फेरले 'पाणी'; खर्चात कपात करण्यासाठी प्रकल्पातून वगळले

ठाणे पालिकेच्या कोव्हिड उपचार केंद्रात तीन बोगस डॉक्‍टरांची नियुक्ती केल्याची बाब दोन दिवसांपूर्वी समोर आली. याप्रकरणी भाजपनेही पालिका प्रशासनाला धारेवर धरत संबंधितांवर कारवाईची मागणी केली. मागील वर्षी मुंब्रा येथे बोगस डॉक्‍टरच्या चुकीमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला होता.

या घटनांच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, कल्याण आणि भिवंडी या ग्रामीण भागात बोगस डॉक्‍टरांचा शोध घेण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी, अन्न व औषध प्रशासन आणि पोलिस प्रशासन यांची समिती तयार करण्यात आली आहे. त्यांच्याद्वारे बोगस डॉक्‍टरांवर कारवाई करण्यात येत असते. 

अधिक वाचा : कांद्याने केला वांदा आणि ताटातली भाजीही महागली; गृहिणींच्या बजेटवरही मोठा परिणाम

महापालिका क्षेत्रात वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या पथकामार्फत कारवाई करण्यात येते. त्यानुसार ठाणे महापालिका क्षेत्रात मागील वर्षभरात आठ बोगस डॉक्‍टरांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी राजू मुराडकर यांनी दिली.

ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मागील चार वर्षांत 36 बोगस डॉक्‍टर आढळून आले. त्यापैकी काही बोगस डॉक्‍टरांनी कारवाईच्या भीतीने व्यवसाय बंद करून पळ काढला; तर 29 डॉक्‍टरांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. 

ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दर तीन महिन्यांनी बोगस डॉक्‍टरांवर करण्यात आलेल्या कारवाईचा आढावा घेण्यात येतो. तसेच ग्रामपंचायत सदस्यांकडूनदेखील बोगस डॉक्‍टरांची माहिती घेण्यात येते. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार बोगस डॉक्‍टरांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येतो. 
- डॉ. मनीष रेंघे, जिल्हा आरोग्य अधिकारी 
 

--------------------------
(संपादन : प्रणीत पवार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action against 37 bogus doctors in Thane district throughout the year