मुंबई - प्रसिद्ध विनोदी अभिनेते संतोष मयेकर (वय 52) यांचे मंगळवारी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई आणि भाऊ असा परिवार आहे.
संतोष मयेकर यांच्या पार्थिवावर उद्या (ता. 3) अंधेरीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांची अंत्ययात्रा अंधेरीतील घरातून सकाळी दहा वाजता निघणार आहे. "टाईम प्लीज', "हीच प्रेमाची गंमत', "प्रेमा तुझा रंग कसा', "विच्छा माझी पुरी करा', "ऑल दि बेस्ट' या नाटकांमध्ये त्यांनी काम केले. मालवणी भाषेवरील प्रभुत्व ही त्यांची खासियत होती. त्यांची विनोद शैली खूपच लोकप्रिय झाली. झी वाहिनीवरील "फू बाई फू' शोमध्ये त्यांचा सहभाग होता. मच्छिंद्र कांबळी यांच्या "भय्या हात पाय पसरी' आणि "वस्त्रहरण' या नाटकांमध्ये त्यांनी भूमिका साकारली होती. कांबळी यांच्या निधनानंतर "वस्त्रहरण'मधील तात्या सरपंचाची भूमिका संतोष मयेकर यांनी साकारली होती. हा त्यांच्या अभिनय कारकिर्दीतील महत्त्वाचा पल्ला होता. "चष्मेबहाद्दर', "गलगले निगगले', "दशक्रिया', "सात बारा कसा बदलला', "इंडियन प्रेमाचा लफडा', "सत्य सावित्री आणि सत्यवान' या चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.
|